लंडनवरून येणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच.

0

 

 

(अनंत नलावडे)

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या आस्थेचा, स्वाभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असून,हे सरकार छत्रपती शिवरायांबाबत अतिशय गंभीर आहे. लंडनहून येणाऱ्या वाघनखांसंदर्भात विरोधक राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून ही वाघनखे महाराजांचीच असल्याचा पुरुच्चार करीत याविषयी शंका उपस्थिती करणाऱ्यांचा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत चांगलाच समाचार घेतला.

आज सभागृहात अकोला पूर्वचे आ. रणधीर सावरकर यांनी लंडनवरून आणण्यात येणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची असण्याबाबत बाहेर जी संभ्रम पसरविणारी चर्चा सुरु आहे यावर सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी केली. यावर सविस्तर बोलताना मुनगंटीवार यांनी त्यांच्या खास शैलीत टीकाकारांना चांगलेच धारेवर धरले.ते म्हणाले की,लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अलबर्ट संग्रहालयात असलेल्या वाघ नखाबाबत विविध पुरावे उपलब्ध आहेत.लंडनवरून आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे प्रदर्शन येत्या १९ जुलैला साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात करण्यात येत असून,तेथे जोरदार स्वागत होणार आहे. कार्यक्रमाचे जाहिर निमंत्रणदेखील त्यांनी आमदारांना व शिवप्रेमींना यावेळी दिले.

मुनगंटीवार म्हणाले की,प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अतिक्रमण हटवले गेल्यानंतर अनेक शिवभक्तांनी छत्रपतीं शिवाजी महाराजांची वाघनखे लंडन मध्ये असून ती भारतात आणावीत अशी मागणी केली.त्यासंदर्भातील काही कागदपत्रे अनेक शिवभक्तांनी आमच्याकडे आणून दिली,पाठवली. व्हिकटोरीया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडे सदर वाघनखे दिली जाण्यापूर्वी लंडनमध्ये १८७५ व १८९६ या वर्षी झालेल्या एका प्रदर्शनात ही वाघनखे प्रदर्शित झाली होती.त्या प्रदर्शनाच्या बातम्यांची कात्रणेही काही शिवभक्तांनी पाठवली,ज्यात ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा उल्लेख त्या प्रदर्शनात केला असल्याचे त्या बातम्यात म्हटले होते.लंडनमधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघनखे आहेत हे खरे असले तरी केवळ या विशिष्ट वाघनखांनाच १८२५ मध्ये विशेष पेटीचे आवरण बनविण्यात आले आहे आणि त्यावर ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी सभागृहात बोलताना दिली.

यासंदर्भात अनेक शिवभक्तांनी लंडनमधील संग्रहालय तसेच ब्रिटिश सरकारच्या संबंधित खात्यांशी पूर्वीपासून केलेला पत्रव्यवहार उपलब्ध असून त्याच आधारावर आम्ही पुन्हा लंडनमधील संबंधित संग्रहालय आणि ब्रिटिश पंतप्रधान यांच्याशी पत्रव्यवहार केला.त्याचे उत्तर देताना संबंधित संग्रहालयाने हे मान्य केले की ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरलेली आहेत,असे सांगून मुनगंटीवार पुढे म्हणाले की, तरीही आम्ही अनेक इतिहास संशोधकांकडून महिती घेतली की जगात कुठे इतरत्र अशी वाघनखे आहेत का? व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयासोबत आपण केलेल्या पत्रव्यवहारात किंवा बोलणी केली तेव्हाही या संग्रहालयाने कधीही ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे नाकारले नाही, अशी माहितीही त्यांनी यावेळी सभागृहाला दिली.
………………….(समाप्त)………..

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech