शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव
मुंबई – विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून त्यांचे सर्व उमेदवार निवडून आले. भाजपाच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत तसेच शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी, कृपाल तुमाने व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे सर्व उमेदवार निवडून आले. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव व ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर निवडून आले; पण आघाडीची काही मते फुटल्याने शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यांना केवळ १२ मते मिळाली.
विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवण्यात येणा-या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे केवळ एका उमेदवाराचा पराभव होणार होता व तो कोण असणार याबद्दल प्रचंड कुतूहल होते. शरद पवार गटाने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे पवार गटाचे १२, शेकापचे स्वत:चे १ व डाव्या पक्षांची ६ अशी १९ मते त्यांच्याकडे होती. शिंदे व अजित पवार गटातील काही आमदारांना स्वगृही परतण्याचे वेध लागल्याने ते या निवडणुकीत मदत करतील, असे सांगितले जात होते; पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला. महायुतीच्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या ३ पक्षांनी आमदारांच्या मतदानाची अचूक आखणी करून निवडणुकीत महाविकास आघाडीवर मात केली. यामुळे अकराव्या जागेसाठी आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरस झाली. या लढतीत नार्वेकर यांनी दुस-या पसंतीच्या मतांच्या आधारे जयंत पाटील यांच्यावर मात केली.
विधान परिषद निवडणुकीत पहिला विजय भाजपाच्या योगेश टिळेकर यांनी नोंदवला. त्यानंतर पहिल्या फेरीत पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण केल्याने टिळेकर यांच्यासह पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे निवडून आले. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे आणि शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी निवडून आल्या. २ वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे या वेळी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासाठी काँग्रेस पक्ष कमालीचा दक्ष होता. पक्षाची ३ ते ४ मते फुटतील हे गृहीत धरून काँग्रेसने सातव यांच्यासाठी मतांचा कोटा निश्चित केला होता. त्यानुसार डॉ. सातव यासुद्धा पहिल्या फेरीत निवडून आल्या. पहिल्या फेरीत मिलिंद नार्वेकर यांना २२ तर जयंत पाटील यांना १२ मते मिळाल्याने त्यांना पहिल्या पसंतीचा कोटा निश्चित करता आला नाही. त्यामुळे दुस-या पसंतीच्या मतांची मतमोजणी झाली. या मतमोजणीत नार्वेकर यांनी बाजी मारली.
पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २३ मते आवश्यक होती. भाजपाला यासाठी ११५ मते आवश्यक होती. त्यांची स्वत:ची १०३ व अन्य ९ अशी ११२ मते त्यांच्याकडे होती; पण त्यांनी १२७ मते मिळवून आपले पाचही उमेदवार निवडून आणले. योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे यांनी पहिल्या फेरीत तर सदाभाऊ खोत दुस-या फेरीत निवडून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ४० मते होती. त्यांना ४८ मते मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या ३७ आमदारांसह अपक्षांच्या साथीने आपले २ शिलेदार विधान परिषदेवर पाठविण्यात यश मिळविले. त्यांनाही ४९ मते मिळाली. काँग्रेसकडे स्वत:ची ३७ मते होती. त्यामुळे त्यांच्यासाठी निवडणूक सोपी होती, तरीही धोका नको म्हणून त्यांना अधिक मतांचा कोटा देण्यात आला होता. काँग्रेसने डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासाठी २७ मतांचा कोटा निश्चित करून उर्वरित मते मिलिंद नार्वेकर यांच्याकडे वळवली होती. खरे तर दोघेही पहिल्या फेरीत निवडून यायला हवे होते. डॉ. सातव २५ मते घेऊन पहिल्या फेरीत निवडून आल्या; पण नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची २२ मते मिळाली. ते दुस-या फेरीत निवडून आले.