मुंबई – वडील आणि दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळी मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला. या पराभवानंतर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी माजी मंत्री पकंजा मुंडेंना तब्बल ५ वर्षांची वाट पाहावी लागली. तत्पूर्वी, २०१४ विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंचा तब्बल २४ हजार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता. त्याचवेळी, गावकी-भावकीप्रमाणे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडेंनी आनंदोत्सव साजरा करत विजयाचा गुलाल उधळला. मात्र, त्या गुलालानंतर संसदीय राजकारणातील विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तब्बल १० वर्षांची वाट पाहावी लागली. त्यात, २०१९ च्या पराभवानंतर जवळपास ५ वर्षांचा राजकीय वनवासच त्यांच्या नशिबी आला होता.
आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने १० वर्षानंतर पंकजा मुंडेंनी कुटुंबीयांसह विजयाचा गुलाल उधळला.विधानपरिषद निवडणुकींचा निकाल हाती आला असून भाजप नेत्या पंकजा मुंडेचा विजय झाला आहे. पंकजा यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्यांचं कुटुंब विधानभवनात दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना २६ मतं मिळाली आहेत. त्यामुळे, या विजयानंतर पकंजा मुंडेंच्या समर्थकांनी जल्लोष केला असून विधिमंडळ परिसरात मुंडे कुटुंबीयही आनंदी असल्याचं दिसून आलं.