मुंबई– घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटीने काल शुक्रवारी अटकेत असलेल्या चार आरोपींविरोधात ३२९९ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. यात १०२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.
या आरोपपत्रात तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त आणि या गुन्ह्यातील संशयित आरोपी कैसर खालिद यांच्या जबाबाचा समावेश असून त्यावरून एसआयटीने खालिद यांची चौकशी केल्याचे स्पष्ट होते. शासन, पोलिस महासंचालक कार्यालयाला विश्वासात न घेता घाटकोपर येथे खासगी कंपनीला जाहिरात फलक उभारण्यास परस्पर परवानगी देताना प्रशासकीय त्रुटी आणि अनियमितता केल्याचा ठपका ठेवत गृहविभागाने खालिद यांना निलंबित केले आहे. हे आरोपपत्र गुन्हा घडल्यापासून ६० दिवसांत झालेल्या तपासावर आधारित आहे.
त्यात इगो मीडियाचा संचालक भावेश भिंडे, माजी संचालिका जान्हवी मराठे, स्ट्रक्चरल ऑडिटर मनोज संघू आणि जाहिरात फलक उभारण्याचे कंत्राट घेणारा सागर कुंभार या चार आरोपींविरोधात आरोप ठेवण्यात आले आहेत.याप्रकरणी उर्वरित तपास बाकी असून अन्य आरोपींना अटक झाल्यास त्यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल,असे गुन्हे शाखेतर्फे सांगण्यात आले.