राज्यात भाजप काढणार संवाद यात्रा

0

नागपूर : विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली असून भाजपकडून त्याअगोदर राज्यात संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी २१ जुलै रोजी पुण्यात ५ हजार पदाधिका-यांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार आहे. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी ही माहिती दिली. भाजपचे सर्व प्रमुख नेते, पदाधिका-यांच्या उपस्थितीत ही संवाद यात्रा काढण्यात येईल. या माध्यमातून राज्याच्या कानाकोप-यात भाजपचे पदाधिकारी पोहोचतील. महाराष्ट्रातील भाजपाचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा सर्व ४८ लोकसभा, सर्व विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती गट आणि नगर पालिका क्षेत्रात पोहचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या सरकारने तिस-या टर्ममध्ये घोषित केलेली कामे व महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामाची माहिती, सरकारने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचविणार येतील. या संवाद यात्रेचा समारोप विधानसभानिहाय होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या यात्रेचे नियोजन २१ जुलै रोजी पुण्यात होईल. तर त्याअगोदर १९ जुलैला मुंबईत संघटनात्मक बैठक होणार असून त्यात महाराष्ट्र पक्ष प्रभारी भूपेंद्र यादव व सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांनी दिली.

आरक्षण विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी ही बैठक होती. मात्र विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बहिष्कार टाकून योग्य केले नाही. विरोधकांची भूमिका निंदनीय आहे. अशी भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही. विरोधक जातीपातीचे राजकारण करत आहे हे जनतेला दिसले. जर चुकून महाराष्ट्रात मविआ सरकार आले तर लोकांच्या लाभाच्या योजना बंद होतील, असा आरोप बावनकुळे यांनी लावला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech