(अनंत नलावडे)
मुंबई – सोमवारी सकाळीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले.मात्र, ही राजकीय बैठक नव्हती, तर शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून राज्यातील तणावपूर्ण परिस्थितीकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही बैठक घेतल्याचे स्पष्टीकरण नंतर भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले.विशेष म्हणजे या बैठकीच्या एक दिवस अगोदर भुजबळ यांनी बारामतीतून बोलावल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले नाहीत,असा जाहीर आरोप याच भुजबळांनी त्यावेळी पत्रकारांशी बोलताना केला होता.
आज मात्र पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, आपण सकाळी शरद पवार यांना त्यांच्या घरी सिल्व्हर ओक येथे भेटायला गेलो होतो.बैठकीसाठी अपॉइंटमेंट घेतली नव्हती. मात्र तरीही आपण साडे दहा वाजताच त्यांच्या घरी पोहोचले, मात्र शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याने आणि ते झोपलेले असल्याने आपण त्यांची दिड तास वाट पाहिली. यानंतर आमची भेट झाली. तब्येत बरी नसल्याने ते पलंगावर झोपले होते. मात्र त्यानंतर मी खुर्चीवर बसून सुमारे दीड तास त्यांच्याशी बोललो.
मी कोणत्याही राजकीय हेतूने आलो नसल्याचे आपण सुरुवातीलाच पवारांना सांगितले. मी मंत्री किंवा आमदार म्हणूनही भेटायला आलेलो नसून माझ्या पक्षाची भूमिका नाही, महाराष्ट्रात तुम्ही ओबीसी आरक्षण देण्याचे काम केले, मात्र आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांच्या कानावर घातले.मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये ओबीसी समाजाचे लोक जात नाहीत, तर ओबीसी, धनगर, वंजारी, माळी समाजाच्या दुकानात मराठा समाजाचे लोक जात नाहीत,अशी विचित्र परि स्थिती राज्यात निर्माण झाल्याचे सांगत राज्याचे ज्येष्ठ नेते या नात्याने राज्यात शांतता राखण्याची जबाबदारी तुमची आहे, असेही आपण पवारांना सांगितले.
कारण मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्याने मराठवाडा चिघळला होता, याची आठवण माझ्यासोबत असलेल्या ज्येष्ठ ओबीसी नेत्याने शरद पवार यांना करून दिली.त्यावेळी तुम्ही हस्तक्षेप करून परिस्थिती सामान्य केली.त्यावर शरद पवार म्हणाले मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये काय चर्चा होत आहे? याची त्यांना जाणीव नाही. मात्र अशा परिस्थितीत येत्या एक-दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करू.सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली. पवार यांनी चर्चेसाठी सकारात्मकता दाखवल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.सध्या त्यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत ते मुख्यमंत्र्यांना फोन करणार आहेत. राज्यातील तणावपूर्ण वातावरण शांत व्हावे, हाच या बैठकीचा उद्देश असल्याचे स्पष्टीकरणही भुजबळ यांनी दिले.मराठा आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मी कोणालाही भेटायला तयार आहे. गरज पडल्यास अगदी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
प्रफुल्ल पटेल यांना बैठकीपूर्वी सांगितले
घर सोडण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याशीही बोलल्याचे भुजबळ म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांशी बोलणार असल्याचे जरी भुजबळ यांनी सांगितले असले तरी याआधी बारामती येथील एका जाहीर सभेत याच भुजबळांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता हे विशेष.ओबीसींच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ९ जुलैला संध्याकाळी ५ वाजता बारामतीतून फोन केल्यानंतर विरोधी पक्षनेते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, असा दावाही त्यावेळी याच भुजबळ यांनी केला होता.
…………………………………………