मुंबई – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्री भेटीत पालघर येथील साधु हत्याकांडाबाबत सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांचे कान टोचायला हवे होते, अशी अपेक्षा डॉ. वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केली. शिवसेना पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शंकराचार्य म्हणाले “खरा हिंदू विश्वासघात करीत नाही” तेच वाक्य पकडून डॉ. वाघमारे पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असे पर्यंत कोणतेही सत्तेचे पद स्वीकारले नाही. याउलट उबाठाने आपले ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतो सांगून स्वत: मुख्यमंत्रीपदाची खूर्ची बळकावली हा विश्वासघात नव्हता का? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदूत्व सोडून सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन लाखो शिवसैनिकांना फसवले हा विश्वासघात करणारे उद्धव ठाकरे हे शंकराचार्याच्या म्हणण्या प्रमाणे हिंदू कसे असू शकतात ? असा सवाल डॉ. राजू वाघमारे यांनी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीत हिरवे झेंडे फडकवत विशिष्ट समाजाच्या लोकांना सोबत घेऊन देखील उबाठाला स्वत:चा स्ट्राईक रेट राखता आला नव्हता. निवडणुकीत घसरलेला मताचा टक्का सावरण्यासाठी आणि जनतेत गेलेली पत सुधारण्यासाठी उबाठाने शंकराचार्यांचा वापर केला की काय अशी शंका मनात येते. यासाठीच जणू शंकराचार्यांना मातोश्रीवर आमंत्रण देण्यात आले होते का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या नकली शिवसेनेला असली शिवसेना करण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न “उभाठा” ने शंकराचार्यांच्या मदतीने केला अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गक्रमण करत आहेत. आदरणीय शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वात मोठे गुरु समजले जातात पण हिंदूत्वावर बोलण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलणे हे कितपत संयुक्तिक आहे असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.
हिंदूत्वाबाबत मनात जराही आस्था नसणारे राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार हे सांगत राज्यातील कॉँग्रेस नेते नाचत होते. मात्र वारीसाठी, वारकर्यासाठी , महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठोबा माऊली साठी वेळ नसल्याचे कारण देऊन राहुल गांधी यांनी लाखो वारकऱ्यांचा व तमाम मराठी जनतेचा अपमान केला आहे अशी टीका ड़ॉ. वाघमारे यांनी केली.