डोंबिवली – मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर काल रात्री झालेल्या वारकऱ्यांच्या बसला काल रात्री झालेल्या अपघाताप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एक्सप्रेस हायवेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही ट्रॅक्टर आणून या अपघातास कारणीभूत झाल्याबद्दल पनवेल पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीच्या घेसर गावातून 54 वारकऱ्यांना घेऊन ही खाजगी बस पंढरपूरला रात्री 10.30च्या सुमारास निघाली होती. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर जात असताना रात्री साडेबारा ते पाऊण च्या दरम्यान समोर आलेल्या ट्रॅक्टरला या बसने धडक दिली आणि हा अपघात घडला. ज्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण बसमधील वारकरी तर दोघेजण ट्रॅक्टर वरील व्यक्ती असल्याची माहिती पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याद्वारे प्राप्त झाली आहे.
दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दुचाकी रिक्षा आणि ट्रॅक्टर या वाहनांना सुरुवातीपासूनच बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील हा ट्रॅक्टर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आलाच कसा? वाहतूक किंवा स्थानिक पोलिसांकडून त्याला एक्सप्रेस हायवेवर जाण्यापूर्वी मज्जा का करण्यात आला आला नाही? असे गंभीर प्रश्नही या अपघातामुळे निर्माण झाले आहेत. कारण केवळ ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करून प्रशासन आपली कातडी वाचू शकत नाही. या पाच जणांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संबंधितांवर देखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.