मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

0

सोलापूर/पंढरपूर – अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर असेच काहीस चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे. आज आषाढी एकादशीचा सोहळा आहे. यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेसाठी स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी, वडिल संभाजीराव शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली, नातू रुद्रांश हे या पूजेत सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी “विठुरायाला चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे”, असे साकडे विठ्ठलाला घातले.

पांडुरंगाच्या आशीर्वादाने सलग तीन वर्षे विठ्ठलाची महापूजा करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. पाऊस चांगला झाला आहे. पेरण्या झाल्या, दुबार पेरणीचे संकट नाही. यंदा मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार चांगले काम करत आहे. चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे. या राज्यातील प्रत्येक घटक सुखी आणि समृद्धी झाला पाहिजे, असे साकडं एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातले. यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. त्यांच्यासोबत पूजा करण्याचे सौभाग्य मिळणे हा माझ्यासाठी बहुमान ठरला.

“73 कोटी संवर्धन जतन संवर्धन करण्यासाठी दिले. त्याचाही उपयोग होतोय. चांगलं काम होतंय. म्हणून मी मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज खरं म्हणजे सगळ्यांना आज आपली पूजा चालू असताना देखील मुखदर्शन बंद केले नाही. ते चालू ठेवलं कारण शेवटी अठरा अठरा तास आपले वारकरी रांगेमध्ये उभे राहतात आणि त्यांना पांडुरंगाचे दर्शन घ्यायचं असतं. पण आपल्या शासकीय पूजेमध्ये दर्शन बंद केले जायचे. पण गेल्यावर्षीपासून आपलं मुखदर्शन देखील सुरु ठेवलं. व्हीआयपी लोकांपेक्षा वारकऱ्यांना पहिले प्राधान्य देण्याचं काम आपण केलंय”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवतडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech