वडलापेठ येथे सुरजागड ईस्पात प्रायव्हेट लिमिटेड उद्योगाचे भूमिपूजन
गडचिरोली – गडचिरोली च्या इतिहासातील आजचा आषाढी एकादशीचा दिवस हा ऐतिहासिक असून माओवाद्यांनी थांबवलेल्या विकास चक्राला पुढे घेऊन जाण्याचे काम सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड च्या उद्योगामुळे होणार आहे. या उद्योगांमुळे जिल्हात दहा हजार कोटींची गुंतवणूक होणार असून आठ दशलक्ष टन उत्पादन होणार आहे. येत्या काळात गडचिरोली ला स्टील सिटी बनवण्याचा आमचा माणस असून, देशातील 30 टक्के स्टीलचे उत्पादन या ठिकाणी होणार आहे. असे प्रतिपादन अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड च्या पायाभरणी कार्यक्रमाप्रसंगी उदघाटन प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित दादा पवार,उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम ,प्रधान उद्योग सचिव हर्षदीप कांबळे ,जिल्हाधिकारी संजय दैने, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील,पोलीस अधीक्षक निलोत्पल, सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे चेयरमन सुनील जोशी,वेदांत जोशी, खमनचेरुचे सरपंच शैलु मडावी आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, लोहखनिज प्रकल्पातून गडचिरोली जिल्ह्यातील युवक युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. लॉयड मेटल्स चौधरी येत्या काळात विस्तारीकरण होणार असून चामोर्शी तालुक्यात 35 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून त्यातून वीस हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र,हे करताना विरोधक अफवा पसरवून नागरिकांत संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे. प्रकल्प उभारताना आदिवासींच्या आराध्य देवदेवतांना कोणताही धक्का लागणार नाही.गडचिरोली जिल्हातील जैवविविधता हे वैभव असून जल,जंगल,जमीन हे टिकवून ठेवून विकास करायचा आहे.उद्योग उभारताना स्थानिकावर अन्याय होऊ न म्हणून 80 टक्के स्थानिक लोकांना रोजगार देणे बंधनकारक केले आहे.उद्योगासाठी जमिनी घेतांना त्याचा योग्य मोबदला देण्यात येईल,त्यासोबत जमीन मालकाचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल.
गडचिरोलीला मुंबई सोबत जोडण्यासाठी थेट गडचिरोलीपर्यंत समृद्धी महामार्गाला जोडण्याची मंजुरी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 170 इनोव्हेशन सेंटर, विमानतळासाठी जागा,वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचे काम माहायुती च्या सरकारने केले आहे. गडचिरोली ला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदी ते गोदावरी नदीच्या माध्यमातून काकीनाडा बंदरापर्यंत जोडण्याची योजना आहे असे करण्यात आपण यशस्वी झालो तर गडचिरोली चे नाव जगाच्या नकाशावर चमकेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात खनिजावर प्रकिया करणारे उद्योग येत असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी युवक-युवतींना रोजगाराच्या संधी मिळून समाधानाचे जीवन जगता येणार आहे.रेल्वे सह चांगल्या सुविधा मिळणार असून आर्थिक सुबत्ता येणार आहे याचा फायदा आदिवासी जनतेने घेतला पाहिजे.महायुती चे सरकार आल्यापासून महिला, शेतकऱ्यांना साठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. धानाला बोनस देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.येत्या काळात हजारो कोटींची गुंतवणूक जिल्ह्यात येणार असून याचा फायदा येथील जनतेने घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, दावोस येथे झालेल्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी म्हणजे सुरजागड इस्पात प्रकल्पाची सुरुवात ,येत्या काळात जिल्ह्यात जे.एस.डब्ल्यू चा मायनिंग प्रकल्प येतो आहे.गडचिरोली ला उद्योग नगरी करण्याचा आमचा मानस आहे. जिल्ह्यातील बसस्थानकांची काँक्रिटीकरण करण्यासाठी चार कोटी 81 लाख निधी देणायत आला आहे. यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात सुरक्षारक्षकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले या सोबतच शाळकरी मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच खमंगचेरू ग्रामपंचायत चे सरपंच शैलेश मडावी यांना रुग्णवाहिकेची चाबी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.