सिंधुदुर्ग – लोकसभा निवडणुकीत उबाठा शिवसेना उमेदवार विनायक राऊत व कोकण पदवीधर निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही सहकार्य केले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा परंपरागत मतदारसंघ आहे. आणि आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदार संघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून अर्चना घारे यांचे नाव निश्चित झाले आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. ओरस येथे ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
ठाकरे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत ठाकरे शिवसेना पक्ष विधानसभा लढणार आहे. त्या ठिकाणी आमचा उमेदवार असल्यामुळे आम्ही काही झाले तरी निवडणुकीला सामोरे जाऊ, असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर आज ओरोस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ.अर्चना घारे, जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, अल्पसंख्यांक अध्यक्ष नजीर शेख, विकास मंगल, शिवाजी घोगळे, संजय सावंत, अविनाश राणे, अपर्बा पवार,वैभव परब, संदेश मयेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.