डीझेलवरील धावणारी लालपरी आता सीएनजीवर करण्याचा निर्णय

0

पुणे – डीझेलच्या वाढत्या किमती, तुटवडा आणि होणारे प्रदूषण यामुळे डीझेलवरील धावणारी लालपरी (एसटी बस) आता सीएनजीवर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील शिरूर, राजगुरूनगर, बारामती आणि सासवड या चार आगारांतील एकूण १३२ लालपरी बसना सीएनजीत रुपांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे विभागात एकूण १४ आगार असून, दररोज हजारो प्रवासी एसटीने प्रवास करतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांसह पर्यटनासाठी प्रवाशांची हक्काची सेवा असलेली एसटी खर्‍या अर्थाने जीवनवाहिनी ठरत आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे महामंडळाने नव्याने इलेक्ट्रिक बस घेण्यावर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या जुन्या बस डीझेलवर चालणाऱ्या असून, डीझेलच्या वाढत्या किमतीमुळे महामंडळाचा सगळ्यात जास्त खर्च इंधनावर होत असल्याचे दिसते. त्यामुळे आर्थिक तूट निर्माण होते. त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून डीझेलवरील लालपरी सीएनजीवर करण्यात येणार आहे. त्याचा एसटी महामंडळाला फायदा होत असून, येत्या वर्षभरात पुणे विभागातील सर्व डीझेलच्या एसटी बस या सीएनजीवर रुपांतरित करण्यात येणार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech