गडचिरोली – गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील जारावंडी पोलीस हद्दीतील बुधवारी वांडोली गावानजिक उडालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत बारा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात ७ पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर छत्तीसगड आणि महाराष्ट्र शासनाचे २ कोटींहून अधिक बक्षीस होते. मृत्तांमध्ये कसनसूर-चातगाव आणि टिपागड-कोरची दलमच्या ५ वरिष्ठ नेत्यांचादेखील समावेश आहे.
नक्षलविरोधी पथकाचे २०० जवान मुसळधार पावसात वांडोली जंगल परिसरात मोहीमेवर असताना दबा धरून असलेल्या नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात जावानांनी केलेल्या कारवाईत १२ नक्षलवादी ठार झाले. तर काही नक्षलवादी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. चकमकीत पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटीलसह शंकर पोटावी आणि विवेक शिंगोळे हे तिघे जखमी झाले. रात्री उशिरा सर्व मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्यात आली.
यात चातगाव- कसनसूर संयुक्त दलम प्रमुख तसेच विभागीय समिती सदस्य योगेश दावसिंग तुलावी ऊर्फ नरेंद्र ऊर्फ निरींगसाय (३६, रा. भिमनखोजी ता. कोरची), कोरची-टिपागड संयुक्त दलमप्रमुख तसेच विभागीय समिती सदस्य विशाल कुल्ले आत्राम ऊर्फ लक्ष्मण ऊर्फ सरदु (४३, रा. गोरगुट्टा ता. एटापल्ली), टिपागड दलम विभागीय समिती सदस्य प्रमोद लालसाय कचलामी ऊर्फ दलपट (३१ रा. वडगाव ता. कोरची), या तीन मोठ्या नक्षल नेत्यांसह महारु धोबी गावडे (३१, रा.नैनेर ता.अहेरी), अनिल देवसाय दर्रो ऊर्फ देवा ऊर्फ देवारी (२८, रा. मुरकुटी ता. कोरची), सरिता जारा परसा ऊर्फ मिना ऊर्फ रामे (३७,रा. गडदापल्ली, ता. एटापल्ली), रज्जो मंगलसिंग गावडे ऊर्फ समिता ऊर्फ सिरोंती ( ३५,रा. बोटेझरी ता. कोरची), सिता हवके (२७, रा. मोरडपार ता. भामरागड ), रोजा (रा. बस्तर एरीया छत्तीसगड), सागर (रा. बस्तर एरीया छत्तीसगड), चंदा ( रा.माड छत्तीसगड), विज्जू (रा. बस्तर एरीया छत्तीसगड) यांचा समावेश आहे.
या सर्वांवर ३०० हून अधिक गंभीर गुन्हे असून महाराष्ट्र शासनाचे ८६ लाख तर छत्तीसगड सरकारचे १ कोटींहून अधिक बक्षीस होते. २०२१ रोजी झालेल्या मार्दीनटोला चकमकीनंतर गडचिरोली पोलिसांना मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. या चकमकीनंतर कोरची-टिपागड आणि चातगाव-कसनसूर दलम पूर्णपणे संपला असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.