अकोला – विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पोलिसांच्या नोटिसला केराची टोपली दाखवली आहे. पुणे पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती. यात त्यांना पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र पूजा खेडकर या अद्यापही वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहेत. तर दुसरीकडे त्यांनी वाशिम मधील मुक्काम वाढवून घेतल्याची माहिती आहे.
देशासह राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पूजा खेडकर हे चर्चेत आल्या आहेत. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर या पुण्यात असतांना चांगल्याच त्यांच्या अवास्तव मागण्यांसाठी चर्चेत आल्या. त्यानंतर त्यांच्या संदर्भात अनेक खुलासे बाहेर यायला लागले. पूजा खेडकर यांच्या सह त्यांच्या कुटुंबातील सदस्यही चर्चेत आले आहेत. पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे हळूहळू बाहेर आले. तर दुसरीकडे त्यांची आई मनोरमा खेडकर यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे वाद थांबता थांबेना अशी परिस्थिती आहे. दरम्यान पूजा खेडकर यांच्यावर पुणे येथील जिल्हाधिकाऱ्यांनी जे आरोप केले होते. या आरोपासंदर्भात लेखी जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांकडून पूजा खेडकरला नोटीस बजावण्यात आली होती. यात त्यांना पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र पूजा खेडकर या अद्याप वाशिममधील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहेत. त्यांनी विश्रामगृहाची बुकींग वाढवून घेतली आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात उपस्थित राहणार का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
वाशिम मध्ये मुक्काम वाढविला! : पुणे येथून बदली झाल्यानंतर पूजा खेडकर या वाशिम मध्ये रुजू झाल्या. मात्र त्यानंतर त्या कायम वादग्रस्त ठरत गेल्या. दरम्यान गेल्या अनेक तासांपासून पूजा खेडकर या वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहेत. पूजा खेडकर यांनी वाशिमच्या विश्रामगृहाची बुकींग उद्या सकाळपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे त्या आज संध्याकाळी वाशिमवरुन निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूजा खेडकर या वाशिममधून निघाल्यानंतर पुणे किंवा दिल्लीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पूजा खेडकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मसुरी मध्ये जॉईन होण्याचा आदेश! : दरम्यान पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी संपवण्यात आला आहे. मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलावण्यात आलं आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली.