(अनंत नलावडे)
मुंबई – लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या अपप्रचारमुळे भाजपला चांगलाच फटका सहन करावा लागला. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना सडेतोड उत्तर देण्यासाठी पक्षाने आता १० नेत्यांची टीम तयार केली असून ही टीम सकाळ-संध्याकाळ टीव्ही चॅनल्सवर बाइट्स किंवा पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केली.
भाजपने दररोज सकाळी ९ वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी चार जणांची टीम तयार केली आहे.त्यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांचा समावेश असून दुपारी चार वाजतासाठी भाजपने आणखी ६ जणांची टीम तयार केली आहे. यामध्ये सुधीर मुनगंटीवार,गिरीश महाजन,अशोक चव्हाण,माधव भंडारी, अतुल भातखळकर, राम कदम या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.तसेच विभागनिहाय आणखी २० नेत्यांची मोठी टीम तयार केली असून त्यात मंत्री रवींद्र चव्हाण, धनंजय महाडिक, संभाजी निलंगेकर, मुरलीधर मोहोळ, संजय कुटे, प्रवीण दटके, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, अमित गोरखे, उज्ज्वल निकम, आशिष देशमुख, भारती पवार, देवयानी फरांदे, चित्रा वाघ,चित्रा वांगडे,अनंत रावते यांचा समावेश आहे.अनिल बोंडे, सदाभाऊ खोत, निरंजन डावखरे, अमित साटम, अनिकेत निकम यांचा समावेश करण्यात आला आहे.
अर्थसंकल्प सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचे नियोजन करा
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी भाजप बुथ स्तरापर्यंत संघटन मजबूत करणार आहे.भाजपच्या सुमारे ९७ हजार बुथमध्ये शक्ती केंद्र मंडल स्तरापर्यंत संघटना सक्षम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या ३० अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय बैठकीची माहितीही बावनकुळे यांनी यावेळी दिली. विधानसभा निवडणुकीसोबतच पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीचीही भाजप तयारी सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गुरुवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत यासंदर्भातली सविस्तर रणनीती तयार करण्यात आली असून महायुतीच्या सर्वसमावेशक अर्थसंकल्पातील विशेष तरतुदी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची योजना कोअर कमिटीच्या बैठकीत मांडण्यात आली.२१ जुलै रोजी पुण्यात पक्षाचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अधिवेशनाचा समारोप करतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
चुकीच्या बातम्या देऊ नका…..
बावनकुळे म्हणाले की, गुरुवारी झालेल्या बैठकीत भाजप नेत्यांनी मित्रपक्षाबाबत कोणतीही चर्चा किंवा भाष्य केलेले नसतानही माध्यमांनी जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या देऊन महायुतीत ठिणगी निर्माण केली. बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती पक्ष देतो, पण जे झाले नाही, त्याबद्दल चुकीच्या बातम्या देणे प्रसारमाध्यमांनी बंद करावे. चुकीच्या बातम्यांमुळे पक्ष संघटनेत नाराजी असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र त्याचवेळी राज्यातील माध्यमांना विशेष उंची आणि संस्कृती असून वृत्त अबाधित ठेवून संकलित केले पाहिजे, अशी सारवासारवही त्यांनी केली.
………………………….