पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अतुल बेनके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. मात्र ही भेट राजकीय नसल्याचं सांगतानाच शरद पवारांनी खळखळून हशा पिकवला. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके आणि शरद पवार यांची भेट झाली.
या भेटीनंतर शरद पवार यांना या भेटीसंबंधी विचारलं गेलं, तेव्हा ते म्हणाले, की अतुल बेनके मला भेटले यात नवीन काय आहे?शरद पवार पुढे म्हणाले, की अतुल बेनके हे सध्या कुठल्या पक्षात आहेत, ते मला माहिती नाही. पण आमच्या दोघांमध्ये कुठलीही राजकारणाच्या विषयावर चर्चा झालेली नाही, गत लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आमच्या उमेदवाराचे काम केले, ते आमचे, असं माझं मत आहे. पवारांच्या या वाक्यावर सगळेच खळखळून हसले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, की अतुलचे वडील म्हणजेच वल्लभ शेठ बेनके हे माझे मित्र होते. म्हणजे अतुल हा माझ्या मित्राचा मुलगा आहे. या भेटी राजकारण आणता कामा नये, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.