बांग्लादेशात हिंसाचार पेटला; ९९८ भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले

0

नवी दिल्ली – बांगलादेशातील आरक्षणविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा हिंसाचार उफाळला आहे. यामुळे आतापर्यंत ९९८ भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना भारतात सुरक्षित परत आणण्यात आले आहे. बांगलादेशातील विविध विद्यापीठांमध्ये आणि प्रमुख शहरांतील रस्त्यांवर आंदोलनाचे लोण पसरले आहे, ज्यामुळे किमान ११५ जण मृत्युमुखी पडले आहेत.

भारत सरकार बांगलादेशातील अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कार्यरत आहे. या संदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपत्कालीन फोन नंबर सुरू केले आहेत. शुक्रवारी बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये मोठा हिंसाचार झाला होता, ज्यामुळे बांगलादेश सरकारने देशव्यापी संचारबंदी लागू केला आहे. ही संचारबंदी रविवारी सकाळपर्यंत लागू करण्यात आली होती, या कालावधीत दिसताच गोळी घालण्याचे आदेश जारी केले होते. तिथे इंटरनेट आणि दूरसंचार सेवाही बंद करण्यात आल्या आहेत.अनेक ठिकाणी बस आणि रेल्वे सेवा थांबवण्यात आल्या असून, शाळा आणि विद्यापीठे पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहेत.

बीएसएफचे डीआयजी म्हणाले की त्रिपुरा सीमारेषेवरून आतापर्यंत १५० विद्यार्थी भारतात परतले आहेत. आंदोलनामुळे ढाक्यासह अनेक शहरांमधील रस्ते ओस पडले आहेत, आणि सुरक्षा दलांकडून गस्त घालण्यात येत आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ढाक्यातील उच्चायुक्त आणि चितगाव, राजशाही, सिलहट, आणि खुलना येथील सहाय्यक उच्चायुक्त तिथे असणाऱ्या भारतीयांना परत आणण्याचे काम करत आहेत. याशिवाय, नागरी उड्डाण, इमिग्रेशन, बंदर आणि बीएसएफच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणले जात आहे.

तसेच आतापर्यंत ७७८ भारतीय विद्यार्थ्यांना रस्ते मार्गांनी भारतात परत आणण्यात आले आहे, तर ढाका आणि चितगाव विमानतळांद्वारे हवाई मार्गाने २०० विद्यार्थी परतले आहेत. बांगलादेशातील विविध विद्यापीठांमध्ये राहणाऱ्या ४००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांशी भारताचे उच्चायुक्त सतत संपर्कात आहेत आणि त्यांना आवश्यक ती मदत करत आहेत.

बांगलादेशात सध्या ८५०० भारतीय विद्यार्थी आणि १५००० भारतीय नागरिक आहेत. त्यांना सुरक्षिततेसाठी दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.भारत सरकारच्या जलद आणि प्रभावी कृतीमुळे अनेक भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यात यश आले आहे, तरीही परिस्थिती गंभीर असून सतर्क राहणे आवश्यक आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech