सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा डी एड बेरोजगार संघर्ष समितीच्या आज ७ व्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्याआंदोलनाला शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने आलेल्या शिस्टमंडळने भेट देत चर्चेसाठी निमंत्रीत केले आहे. तर आपल्याला न्याय देण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित मंत्रालयीन अधिकाऱ्याची लवकरच बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल असेही शिक्षण मंत्री यांनी सांगितले असल्याचे यावेळी अशोक दळवी यांनी डी एड उमेदवारांना सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त असलेल्या शिक्षक पदांवर स्थानिक उमेदवारांना सामाऊन घ्यावे, या मागणीसाठी गेले ७ दिवस मुसळधार पावसात ,स्थानिक डी एड उमेदवारांचे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन सुरु आहे. काळ्या फीती लावून आंदोलन, अन्नत्याग, थाळीनाद यासारख्या विविध प्रकारे आंदोलन करून शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करण्यात आला. तर जोरदार घोषणा देऊन शासनाचे लक्षही वेधण्यात आले. या आंदोलनाला यापूर्वी पालकमंत्री, शिक्षण मंत्री, माजी आमदार राजन तेली, शरद पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत , शेतकरी संघटनेचे जयप्रकाश चमणकर यांनी, तर आज युवा सेनेचे सुशांत नाईक यांनी भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येकाने आपल्यापरिने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तरीही स्थानिक उमेदवारांच्या पदरी काहीच पडलेले नाही .
आजच्या ७ व्या दिवशीही आंदोलन सुरु असून यामध्ये मोठ्या संख्येने महिला उमेदवार आपल्या छोट्या एक-दोन महिन्याच्या बाळाना घेऊन भर पावसात आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तर शासनाने दखल न घेतल्यास बेमुदत उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा दिला आहे.
याची दखल घेत आज ७ व्या दिवशी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने आलेल्या अशोक दळवी, प्रेमानंद देसाई , सुनील दुबळे, संजय गावडे , एकनाथ हळदणकर यांच्या शिष्टमंडळाने डी एड उमेदवारांची भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी आपली मागणी योग्य असून खरोखरच शासन धोरणामुळे तुमचे नुकसान झाले आहे. हे आम्हीही शिक्षण मंत्री व संबंधित अधिकाऱ्याच्या निदर्शनात आणून देऊ , त्यासाठी चर्चा होणे अपेक्षित असून त्यासाठी शिक्षण मंत्री केसरकर यांनी दोन दिवसात चर्चेसाठी बोलविल्याचे सांगितले .
शिक्षण मंत्र्यांच्या निमंत्रणाचा सन्मान राखुन डी एड संघटनेचे अध्यक्ष विजय फाले व त्यांचे काही सहकारी चर्चेसाठी जाणार आहेत. मात्र सकारात्मक निर्णय जो पर्यंत होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहिल. चर्चेचा शेवट गोड झाल्यास आंदोलन थांबवू, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करत बेमुदत उपोषण करून जीवन संपवू असा इशाराही यावेळी संघटना अध्यक्ष विजय फाले यांनी दिला आहे.