भाजपा गटनेते दरेकरांचा जरांगेंना सवाल
मुंबई- मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अण्णासाहेब पाटील यांच्यापासून अनेक नेत्यांनी आंदोलने केली, बलिदान दिले. अनेक नेत्यांनी प्रचंड काम केले, अभ्यास करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या एका भूमिकेवर विषय मांडला तर मराठा समाजाचा अपमान कसा काय होतो. मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? असा सवाल भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरेकर म्हणाले की, जरांगे यांनी सबुरीने घेण्याची गरज आहे. तुम्ही मॅनेज होत नाहीत हिच तुमची ताकद, सामर्थ्य आहे. हे मराठा समाजाला माहित आहे. म्हणून समाज आपल्या पाठीशी उभा आहे. पण तुम्हाला कुणी काही बोललं तर त्याला शिवराळ भाषा, एकेरी, हमरीतुमरी बंद केले पाहिजे. स्वतःची वक्तव्य मुजोरपणासारखी वाटतात आणि दुसऱ्याला मुजोरडा, माजोरडा बोलायचे. एका आंदोलनाच्या यशामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका. राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नांचे नेतृत्व करा. सरकार मराठा समाजासाठी काय करतंय ते कालच्या कार्यक्रमात आम्ही दाखवले.
मराठा समाजासाठी ज्यांनी पहिले बलिदान दिले ते अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी पुस्तिका तयार केली आणि एक लाख बेरोजगार मराठा तरुणांना उद्योजक बनवले तेही जाहीर केले. मराठा समाजाच्या प्रश्नी सरकार सकारात्मक आहे, चर्चा करत आहे. परंतु आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्याची दखल घेण्याऐवजी शिवराळ भाषा वापरली जाते. आम्हीही 20 वर्षे राजकारणात आहोत. आम्ही संघर्षातून तयार झालो आहोत. गरीब कुटुंबातून येऊन आम्ही प्रगती केलीय.
सगळेच शिव्या सहन करणारे नसतात. संयमाने बोला. मागण्या ताकदीने मांडा आम्ही सोबत आहोत. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अण्णासाहेब पाटील यांच्यापासून अनेक नेत्यांनी आंदोलने केली. अनेक नेत्यांनी बलिदान दिले. अनेक नेत्यांनी काम केले, अभ्यास करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या एका भूमिकेवर विषय मांडला तर मराठा समाजाचा अपमान कसा काय होतो. मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? असा सवालही दरेकरांनी केला.
दरेकर पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी सत्तेत यावे. सत्तेत येऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. आता सत्तेत आहेत त्यांच्याकडून दिरंगाई होतेय त्याची कारणेही त्यांना समजतील. त्यांनी सत्तेत यावे यासाठी आमच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. परंतु विशिष्ट लोकांना नजरेसमोर ठेऊन आपले टार्गेट करू नका. आपण सांगता महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले तर चालतील, शिंदे-पवार यांचे चालतील. भाजपा आणि फडणवीस यांचे उमेदवार पाडणार म्हणजे डाल मे कुछ काला है असा संशयही दरेकरांनी व्यक्त केला. तसेच तुमचा उद्देश हा भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवणे हा आहे का? मराठा समाज हा सर्व पक्षांत आहे. समाजात विभाजन होऊ नये याकरिता समाज शांततेत आहे. पण मी बोलेन तेच समाज या अविर्भावातून जरांगे यांनी बाहेर यायला पाहिजे, अशी विनंतीही दरेकरांनी केली.
जरांगे एकप्रकारे महाविकास आघाडीचा बचाव करत आहेत. त्यांनी शरद पवारांना, उद्धव ठाकरें, काँग्रेसच्या नेत्यांना विचारावे की ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यावर भूमिका काय? या तिन्ही पक्षांना काहीच विचारायचे नाही कारण सरकार म्हणून काम करत असताना एखाद्या प्रश्नावर, आंदोलनावर निर्णय घेत असताना त्याकडे सामाजिक प्रश्न म्हणून पाहिले जाते. सरकारला सर्व जातीधर्म यांना एकत्रित करून निर्णय घ्यावा लागतो. जरांगे यांनी संयमाने आंदोलन करावे, आक्रमक भुमिका घ्यावी. जागतिक स्तरावर मराठा समाज आपली शक्ती शांततेच्या मार्गाने दाखवू शकतो आणि सरकारवर दबाव आणून न्याय मिळवू शकतो हा संदेश गेलाय. शिवराळ भाषा प्रश्न सोडवायला योग्य नाही.
दरेकर पुढे म्हणाले की, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी भाजपा हा सरकारमधील प्रमुख घटक पक्ष आहे. त्याचे आमदार सर्वाधिक आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे हे आम्ही कधीही नाकारत नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जर आपला मोठा पक्ष आहे, आपल्या नेतृत्वाखाली सरकार येणार असे जर अमित शहा म्हणाले तर त्याचे वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही. त्याच अधिवेशनात राज्याचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोण मुख्यमंत्री होणार याच्या चर्चा बंद करा, मुख्यमंत्री महायुतीचाच होईल असे म्हटले.
अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारेच त्यांनी शरद पवार यांच्यावर वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी पुन्हा बोलणे योग्य वाटत नाही. तसेच प्रत्येक नेता पक्षाला ताकद देण्यासाठी भूमिका घेतो. महायुतीबाबत भाजप आणि सहयोगी पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. विधानसभा एकत्र लढणार आहोत ते स्पष्ट असल्याचेही दरेकरांनी म्हटले.
संजय राऊत यांचा कायद्याचा अभ्यास जास्त
दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांचा कायद्याचा अभ्यास जास्त झाला आहे. त्यांना अटक झालीय, जेलमध्ये जाऊन आलेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास नीट झालेला आहे. राऊत यांच्या वक्तव्याला आम्ही अजिबात किंमत द्यायचे नाही असे ठरविले आहे. त्यांचे कुठलेही वक्तव्य संदर्भहीन असते. तुमच्या घरातल्या माणसांना तुम्हाला टिकवता आले नाही हा तुमचा कमकुवतपणा आहे. स्वतःचा कमकुवतपणा लपविण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करायचे हा संजय राऊत यांचा नित्यक्रम झाला असल्याचा टोलाही दरेकरांनी लगावला.