पुणे – आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना वाय.सी.एम रुग्णालयाने सात टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. यानंतर वायसीएम रुग्णालयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांना दिले होते. चौकशीअंती दिव्यांग प्रमाण पत्राबाबत संबंधित डॉक्टरांना क्लिन चिट देण्यात आली आहे. चौकशीत कोणीच दोषी आढळले नसल्याची माहिती राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना वाय.सी.एम रुग्णालयाकडून सात टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये फिजिओथेरपी आणि अस्थीरोग तज्ज्ञ यांच्याकडे राजेंद्र वाबळे यांनी खुलासा मागवला होता. संबंधित डॉक्टरांनी केंद्र सरकारच्या नियमानुसार सात टक्के दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं खुलाशात सांगितलं आहे. त्यांनी कुठलीही हेराफेरी केल्याचं निदर्शनास आलेलं नाही, असं राजेंद्र वाबळे यांनी सांगितलं आहे.
दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांनी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिलं होतं. ते बनावट असल्याचं सांगण्यात येत आहे. रेशनकार्डची शहानिशा करणे रुग्णालयाचे काम नाही. असं स्पष्टपणे राजेंद्र वाबळे यांनी सांगत रुग्णालयावरील आरोप फेटाळले आहेत.