सोलापूर – आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात चार हजार ५०० विशेष बस सोडल्या. यात्रेच्या नऊ दिवसांच्या काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल नऊ लाख ५३ हजार भाविकांनी पंढरपूरला जाण्यासाठी एसटीच्या सेवेचा लाभ घेतला. यातून एसटी महामंडळाला २९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत एक लाखाने तर उत्पन्नात एक कोटीने वाढ झाली आहे. पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक येतात. या वारकऱ्यांसह इतर प्रवाशांना एसटीची प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. एकाच गावात ४० पेक्षा जास्त प्रवासी असल्यास थेट गावातून पंढरपूरपर्यंत गट प्रवासी सुविधाही उपलब्ध केली होती. त्याचबरोबर ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजनांच्या सवलती कायम ठेवल्या होत्या.
यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन फुकट प्रवास करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी विविध मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके, तात्पुरत्या स्वरूपात चार बसस्थानके उभारण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी अतिरिक्त तिकीट खिडक्यांचे नियोजन केले होते. महिन्याभरापासून सुरू असलेली यात्रेची लगबग गोपाळ काल्याने संपली. एकादशीपासून नऊ दिवसांच्या कालावधीत एसटीच्या जादा बसचा लाभ राज्यातील ९ लाख ५३ हजार भाविकांनी घेतला.