लहान गोष्टीचा मोठा बाऊ करताना जरा भान बाळगा….! शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी विरोधकांना खडसावले

0

 

(अनंत नलावडे)

मुंबई – बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील एका कवितेत हिंदी व इंग्रजी शब्द वापरण्यात आल्याने वादंग उठल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित कवितेतील वन्स मोर शब्द समितीने तपासण्याचे आदेश देतानाच सर्रास वापरात येणाऱ्या लहान गोष्टींचा विरोधकांनी बाऊ न करण्याचा सणसणीत टोला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

संबंधित कवितेतील वन्स मोर तपासण्याचे आदेशही त्यांनी यावेळी यासंदर्भात असलेल्या अभ्यास गटाच्या समितीला दिल्याचे सांगत केसरकर यांनी याची पाठराखणही केली.

बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या मराठी पुस्तकातील जंगल मैफल ठरली या कवितेतील यमक जुळविण्यासाठी हिंदी,मराठी शब्द घुसवले आहेत.विविध तज्ज्ञांनीही या कवितेवर आक्षेप घेत, आपली परखड मते मांडलेली असून सर्वच क्षेत्रात कवितेवर टीकेची झोड उठली आहे.त्यासंदर्भात बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी निवड समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर एखादी कविता किंवा लेख अभ्यासक्रमात समाविष्ट केला जातो.तसेच त्याची त्रयस्थ व्यक्तींकडूनही तपासणी केली जाते. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच संंबंधित कविता समाविष्ट केली होती. मात्र अद्याप त्यावर कुणीही आक्षेप घेतला नव्हता,असाही खुलासा करत केसरकर यांनी मात्र यावर सारवासारव करण्याचाही यावेळी प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी सध्या वाद सुरू झाल्याने या कवितेबाबत अभ्यास गटाच्या समितीकडे प्रस्ताव पाठवून त्यावर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्याची माहितीही केसरकर यांनी दिली.तसेच साहित्यिक व तज्ज्ञांशी चर्चा करून रुढ शब्दांची खात्री करा मगच वापरा, अशा सूचनाही संबंधितांना दिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेल्या १८ वर्षापासून मराठी भाषेचे धोरणच राज्यात आले नव्हते.तेंव्हा त्यावेळी कोणाला मराठीचा कळवळा आला नव्हता.मात्र आता सरकारने मराठी भाषेचे धोरण आखले असून प्रत्येक शासकीय कार्यालयात मराठी बोलणे सक्तीचे केले आहे.मराठीचा आम्हा प्रत्येकाला अभिमानच आहे. परंतु, एखाद्या कवितेत इंग्रजी शब्द आला असेल आणि तो रुढ झालेला असेल तर काय हरकत आहे? काही शब्द रुढ झाले आहेत.मुलांना देखील त्या शब्दांची सवय झाली आहे.परंतू लहान गोष्टींचा किती बाऊ करायचा? प्रत्येकाला याचे भान असायला हवे, याचा पुनरुच्चार करत केसरकर यांनी विरोधकांना खडे बोलही सुनावले.
……………………………

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech