मुंबई – देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे. देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृह येथे हळद संशोधन केंद्राबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी पणन मंत्री अब्दुल सत्तार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, माजी खासदार हेमंत पाटील, कृषी विभागाच्या सचिव व्ही. राधा, भाभा अणुसंशोधन केंद्राचे प्रदीप मुखर्जी, केंद्रीय स्पाईस बोर्डच्या महाराष्ट्र प्रमुख ममता रुपेलिया यावेळी उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे एकीकृत हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र तयार होत आहे. या केंद्रासाठी 800 कोटी रुपयांचा निधी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
हळदीचा वापर दैनंदिन जीवनापासून ते औषध निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे हळदीला देश आणि जगभरातून मोठी मागणी आहे. या पिकास कीड कमी प्रमाणात लागते पाण्याचा वापर कमी प्रमाणात होतो. नैसर्गिक आपत्तीस तोंड देणारे हे नगदी पीक असून त्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शासकीय अभिसरण योजनांचा लाभ या केंद्रास देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. वसमत हळदीला जीआय मानांकन मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
या संशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता असलेले उती संवंर्धीत (टिश्यू क्लचर) रोपांसाठी प्रयोगशाळा, हळद प्रक्रिया केंद्र, विकीरण केंद्र करण्यात येत आहे. देशभरात 50 लाख टन हळदीचा वापर होतो. त्यापैकी निम्मी हळद महाराष्ट्रात उत्पादित होते. जागतिक दर्जाचा देशातील हा एकमेव प्रकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांची हळद निर्यात केली जाईल, त्याच बरोबर बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मोठी मदत होईल, असे हळद केंद्राचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.