छ. संभाजीनगर : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. राज ठाकरे यांच्या या निर्णयाने मराठी मतांमध्ये फूट पडून उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.
लोकसभेत भाजपने मनसेचा वापर करून मराठी मते फोडण्याचे काम केले. विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचा हाच उद्देश दिसतोय. लाडक्या बहीण-भावापेक्षा लाडक्या सुपा-या जास्त प्रिय दिसतात. त्यांनी एवढ्या वर्षांत सुपा-याच घेतल्या, असे म्हणत दानवेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
कोण किती जागा लढणार यापेक्षा किती लोक निवडून येणार हे महत्त्वाचे आहे. मनसेने लोकसभेत बिनशर्थ पाठिंबा दिला होता. मराठी मते फोडण्यासाठी मनसेचा वापर केला गेला. त्यामुळे मराठी मतात फूट पाडण्याचे पाप मनसेने केले, असे देखील दानवे म्हणाले.
ठाकरेंमुळे भाजप महाराष्ट्रात उभी राहिली. भाजपला खेड्यापाड्यात कोणी विचारत नव्हते. ठाकरे पिता-पुत्रामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. लोक अनाजीपंताबाबत बोलतात ते खोटं नाही. आत्ताचे अनाजी पंत फडणवीस आहेत, असे म्हणत दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.