पॅरिस – ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात हाेण्यापूर्वी फ्रान्समध्ये रेल्वे नेटवर्कवर हल्ला झाला. अनेक रेल्वेमार्गांवर ताेडफाेड करण्यात आली. काही ठिकाणी जाळपाेळ करण्यात आली. या घटनांमध्ये अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या. अनेक गाड्या दीड ते दाेन तास विलंबाने धावत हाेत्या. याचा सुमारे आठ लाख लाेकांना फटका बसला आहे. हल्ला काेणी आणि का केला, याबाबत माहिती समाेर आलेली नाही.
फ्रान्समध्ये पॅरिस येथे यंदाच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे २६ जुलै राेजी उद्घाटन झाले. त्यापूर्वीच स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजताच्या सुमारास हल्ला झाला होता. यामुळे शेजारी देश बेल्जियम तसेच इंग्लिश खाडीमार्गे लंडनला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवरही परिणाम झाला.
फ्रान्सच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेकडील रेल्वेमार्ग या हल्ल्यामुळे प्रभावित झाले. फ्रान्सच्या नॅशनल रेल्वे कंपनीने सांगितले की, हायस्पीड रेल्वेमार्गावर काही ठिकाणी संशयास्पद कारवाया झाल्या आहेत.
रेल्वे रुळांचे माेठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांच्या बाजूला समांतर असलेल्या केबल्सचेही नुकसान करण्यात आले आहे. यामुळे रेल्वेसेवा सुरू करण्यात प्रचंड अडचणी निर्माण हाेतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुमारे आठ लाख प्रवाशांना या हल्ल्याचा फटका बसला आहे. हल्लेखाेरांनी रेल्वेच्या केबल्सची जाळपाेळ केली. अधिकाऱ्यांनी या मार्गांवर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकताे.
इस्रायलने फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांना गुरुवारी एक पत्र लिहून आपल्या देशाच्या खेळाडूंवर हल्ला हाेण्याची शक्यता असल्याचे म्हटले हाेते. इराण समर्थित दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी माहिती मिळाल्याचे इस्रायलने पत्रात म्हटले हाेते.
१९०० या वर्षात पॅरिसमध्येच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेवर सर्वप्रथम हल्ला झाला हाेता. काही समाजकंटकांनी गर्दीवर बाॅम्ब फेकला हाेता. त्यात अनेक जण जखमी झाले हाेते. १९७२ आणि १९९६ मध्ये असे हल्ले झाले होते.
दरम्यान हल्ल्यानंतर ब्रिटनने आपल्या नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी फ्रान्सच्या रेल्वे नेटवर्कचा वापर करू नये, असे सांगण्यात आले आहे. युराेस्टार या ब्रिटिश रेल्वे कंपनीनेदेखील अनेक रेल्वे रद्द आणि काहींचे मार्ग बदलले आहेत. दुपारनंतर काही रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या.