छत्रपती संभाजीनगर – मला भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधून तडीपार केले होते. अशी तडीपार व्यक्ती देशाचे गृहमंत्री झाले आहेत. त्यामुळे आपला देश कुठल्या मार्गावर चालला आहे, याचा विचार करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. शरद पवार यांच्यावरील पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वांत जास्त भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
पवार म्हणाले, देशातील भ्रष्टाचाऱ्यांचा सुभेदार मी आहे, असं अमित शाह यांनी म्हटलं. पण, गृहमंत्री गुजरातमध्ये असताना कायद्याचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने तिथून तडीपार केलं होतं. ज्यांना सर्वोच्च न्यायालयानं तडीपार केलं होतं. ते आज देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे आपला देश कुठल्या मार्गावर आहे चालला आहे, याचा विचार करण्याची गरज आहे.
यावेळी त्यांनी प्रकाशित झालेल्या पुस्तकावर भाष्य केलं. माझ्याबद्दल इथे खूप चांगलं बोललं गेलं. मी हे पुस्तक १० ते १२ वर्षापूर्वी लिहिलं होतं. त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या. आज जे काय घडतंय ते लिहिणं गरजेचं आहे. एक प्रकारचा संघर्ष करण्याची वेळ आली होती, असं सांगतानाच शरद पवार यांनी मराठवाडा नामविस्तार आंदोलनाच्या आठवणी जागवल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला खूप आव्हानं होती. त्यावेळच्या पोलीस आयुक्तांनी खूप मेसेज केले. अनेकांचे घर जळत आहेत. निर्णय लोकांना मान्य नाही. यात बदलणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. त्यांच्या नावाने असलेलं विद्यापीठ का नको? त्याला विरोध का? त्यावेळी सक्तीचं निर्णय घेणं गरजेचं होतं. म्हणून मी निर्णय घेतला, असेही पवार म्हणाले.