नवी दिल्ली – पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदकाला गवसणी घालत भारताला या ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळवून दिले. ऑलिम्पिकच्या यंदाच्या हंगामातील मनू भाकर ही पदक जिंकणारी देशातील पहिली महिला नेमबाज ठरली. मनू भाकरच्या या विजयानंतर देशभरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसह अनेकांनी ट्विट करत अभिनंदन केले.
भारताला तुझ्यावर अभिमान – राष्ट्रपती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या, 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्यानं मनू भाकरचे हार्दिक अभिनंदन…मनू भाकर नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. भारताला तुझ्यावर अभिमान आहे, असं द्रौपदी मुर्मु म्हणाल्या.
एक ऐतिहासिक पदक… – पंतप्रधान
एक ऐतिहासिक पदक…मनू भाकरने भारतासाठी पहिले पदक जिंकून अप्रतिम कामगिरी केली. कांस्य पदक जिंकणाऱ्या मनूचे खूप अभिनंदन. शूटिंगमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू असल्याने तिचे हे यश खूप खास आहे. ती भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.