तालुक्यात १५०० अधिक गणेशमूर्ती कला केंद्र
रायगड – रायगड जिल्ह्यात या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणेश कला केंद्रांमध्ये मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. श्रीगणेशाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या पेण तालुक्यातील गणेश कला केंद्रांवर दररोज हजारो मूर्ती तयार होत आहेत. तालुक्यातील हमरापूर, कळवा, जोहा, तांबडशेत, दादर, रावे, सोनकार, उरनोळी, हणमंतपाडा, वडखळ, बोरी, शिर्की या गावांत गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती बनविल्या जातात. गणेशोत्सवानिमित्ताने पेणमधून ५० हजार गणेशमूर्ती परदेशात तर देशभरात सुमारे ३० लाख गणेशमूर्ती रवाना होणार आहेत.
सुबक आखणीमुळे गणेशमूर्तीत जिवंतपणा आणणा-या पेणमधील गणेशमूर्ती कलेला जागतिक स्तरावर स्थान आहे. आकर्षक रंगसंगती, मूर्तीची ऐटदार मांडणी आणि पर्यावरणपूरक साधनांचा वापर यामुळे पेणमधील गणेशमूर्तींना जगभरातून मागणी वाढत आहे. पेणमधील मूर्तींना अमेरिका, यूएई, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा आदी देशांतून मागणी असते.
परदेशातील ग्राहकांना गणेशोत्सवापूर्वी मूर्ती मिळावी, यासाठी एप्रिल-मेपासूनच त्या रवाना केल्या जातात. दोन महिन्यांच्या समुद्र प्रवासात त्या सुरक्षित राहाव्यात, यासाठी पॅकेजिंगकडे विशेष लक्ष दिले जाते. मूर्ती निर्यात करण्यासाठी साधारण दोन कंटेनरसाठी तीन लाख रुपये खर्च येतो. यात मध्यम १ ते २ फूट आकाराच्या ७०० मूर्ती असतात, पेणचे के. वामनराव देवधर आणि के. राजाभाऊ देवधर यांनी या व्यवसायाला चालना दिली. पुढे त्यांच्याकडे शिकणा-या काही कारागिरांनी स्वत: व्यवसाय सुरू केले आणि हा व्यवसाय भरभराटीस येत गेला.
सुबक मूर्ती आणि आकर्षक रंगसंगतीमुळे पेणच्या गणेश मूर्तींना मागणी वाढत गेली. सुरुवातीला कोकण, त्यानंतर मुंबई-पुण्यात पेणच्या गणेशमूर्ती जायला लागल्या. हळूहळू राज्यभरातून पेणच्या गणेशमूर्तींना मागणी येण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दशकांत या मूर्तींची लोकप्रियता इतकी वाढली की देश-विदेशातून पेणच्या गणेशमूर्तींना मोठी मागणी व्हायला लागली. त्यामुळे गणेशमूर्तिकारांचे गाव म्हणून पेण नावारूपास आहे. दरवर्षी ५० ते ६० कोटींची उलाढाल होते. पेणच्या गणेशमूर्ती कलेला १५० वर्षांचा इतिहास लाभला आहे.