आमदार अतुल भातखळकर यांचा विश्वास, मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
मुंबई : रोजागारक्षम पिढी तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आम्ही महिला आधार भवन येथे मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे अकाउंट असिस्टंट, टॅली ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग असे कोर्स शिकवले जाणार आहेत. हे कोर्स पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थांना नोकरी मिळणे सोपे होणार आहे, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले. कांदिवली पूर्व विधानसभेत हनुमान नगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ महिला आधार भवन या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार भातखळकर म्हणाले, जगाच्या पाठीवर आज भारत सर्वात तरुण देश आहे. जे लोक आज बेरोजगारीच्या नावाने राजकीय गळे काढतात त्यांनी योग्यवेळी योग्य धोरणे स्वीकारली असती तर देशातील तरुण पिढी कला, कौशल्याने समृद्ध करता आली असती. गेल्या १० वर्षाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ज्या प्रमुख बाबींवर भर देण्यात आले, त्यात कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. जे मनुष्यबळ कामासाठी उपलब्ध आहे, ते रोजगारक्षम असायला हवे. त्यामुळेच हे प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे.
या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे नवे कोर्स सुरु करण्यात आले आहेत. याशिवाय मालाड, पोयसर भागात सुद्धा असे कोर्स सुरु करण्यात येणार आहेत. ज्या कोर्ससाठी साधारण २५ ते ४० हजार रुपये खर्च येतो तोच कोर्स आम्ही मोफत शिकवत आहोत. त्यासाठी आवश्यक संगणक आणि अन्य तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षणानंतर रितसर त्याची परीक्षा सुद्धा होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी कोसिया संस्थेचे निनाद जयवंत, आर. सी. रॉय यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.