मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल शिवसेना उपनेते   संजय निरुपम यांची माहिती 

0

(अनंत नलावडे)

मुंबई -राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ला संपूर्ण राज्यातून तुफान प्रतिसाद मिळत असून योजनेची नोंदणी सुरु झाल्यापासून अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाखांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत.लवकरच २ कोटींचा टप्पा गाठेल,असा दावा शिवसेना उपनेते, प्रवक्ते आणि माजी खा.संजय निरुपम यांनी मंगळवारी बाळासाहेब भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’बाबत निरुपम पुढे म्हणाले की, नारीशक्ती दूत या ॲपमुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी झाली असून या ॲपमधून दररोज ७ ते ८ लाख अर्ज सादर होत आहेत. त्याशिवाय नारीशक्ती दूत या ॲप्लिकेशन्सचे ८८ लाख डाऊनलोड्स झाले आहेत.तरं प्रत्येक मिनिटाला या ॲपचे ८०० डाऊनलोड्स होत आहेत. सगळ्यात जास्त डाउनलोड होणाऱ्या ॲपमध्ये नारीशक्ती दूत ॲप देशात २७ व्या क्रमांकावर आहे. या ॲपमधून प्रत्येक मिनिटाला ६५० अर्ज सादर केले जात आहेत. इतका प्रचंड प्रतिसाद या आधी कोणत्याही योजनेला मिळालेला नाही,असाही दावा करत या योजनेला मिळणारा तुफान प्रतिसाद हे राज्यातील माता भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोचपावती आहे,असल्याचे प्रमाणपत्रही निरुपम दिले.

ते म्हणाले की, आतापर्यंत १ कोटी ३० लाख ऑनलाईन ॲप्लिकेशन्स सरकारला प्राप्त झालेले असून ऑफलाइन पद्धतीने ५० लाख प्राप्त झाले आहेत.या योजनेसाठी राज्यातून किमान २ कोटी ते अडीच कोटी महिला पात्र ठरतील,असे सरकारने उदिद्ष्ट ठेवले आहे.येत्या ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत जे ॲप्लिकेशन येतील तेवढे स्वीकारण्यात येतील,अशी माहितीही निरुपम यांनी दिली.मुंबई आणि परिसरात नोंदणीसाठी शिवसेना पक्षाकडून २ ऑगस्ट २०२४ पासून प्रचार अभियान सुरु केले जाईल,असे निरुपम यांनी यावेळी जाहीर केले.

राज्यातून सर्वात जास्त नोंदणी पुणे जिल्ह्यातून झाली असून पुणे जिल्ह्यातून आतापर्यंत ८ लाख ६३ हजार महिलांनी फॉर्म भरले आहेत. योजनेसाठी सरकारकडे पैसे नाही, अशी टीका करणाऱ्या विरोधकांचाही निरुपम यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की,या योजनेसाठी राज्य सरकारने केंद्राकडे एकही रुपया मागितलेला नाही.ही राज्य सरकारची स्वतःची योजना आहे. काँग्रेससारखी खटाखट योजना नाही.मुख्यमंत्री शब्द पाळणारे आहेत.‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’साठी राज्य सरकार कटिबद्धच असून अर्ज केलेल्या ज्या महिलांचे केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल अशा कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट २०२४ रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३००० रुपये जमा होतील,असा विश्वासही निरुपम यांनी व्यक्त केला.
………………………

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech