अनुराग ठाकूरांनी भाजपाची मनुवादी वृत्ती दाखवली……! नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल

0

 

(अनंत नलावडे)

मुंबई – लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्यानेच चातुर्वर्ण्य व्यवस्थेतच्या विचारधारेतून आलेल्या भाजपचे खा. अनुराग ठाकूरांनी “ज्यांच्या जातीचा पत्ता नाही, ते जातनिहाय जनगणेची मागणी करत आहेत” असे वक्तव्य करून या देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान करून भाजपची मनुवादी वृत्ती दर्शवली, अशा शब्दांत काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. काँग्रेस व इंडिया आघाडीतील मित्र पक्ष जातनिहाय जनगणना करण्यास कट्टीबद्धच असून फक्तं भाजपचा जातनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे.त्यामुळेच लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायाच्या लढ्याचे रणशिंग फुंकले असून भाजपने कितीही विरोध केला तरी देशात जातनिहाय जनगणना होणारच असाही इशारा पटोले यांनी दिला.

पटोले म्हणाले की,भाजप खा.अनुराग ठाकूर यांनी आपल्या पक्षाच्या मनुवादी वृत्तीचे प्रदर्शन करून भारतातील ८० टक्क्यांहून अधिक बहुजन समाजाचा अवमानच केला असून प्रदेश काँग्रेस भाजपच्या या मनुवादी वृत्तीचा निषेधच करत आहे.जात व धर्माच्या आधारावर राजकारण करणे हाच भाजपाचा अजेंडा आहे.लोकसभेच्या सभागृहात विरोधी पक्षनेत्याची जात विचारणारे लोक त्याच विचारसरणीचे आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला होता,आणि आज २१ व्या शतकातही हीच मनुवादीवृत्ती कायम असल्याचे भाजपा खा.अनुराग ठाकूर यांनी दाखवून दिल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

आपल्या लोकसभेतील भाषणातून चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि मनुवादाचे प्रदर्शन करणा-या अनुराग ठाकूर यांच्या समर्थनार्थ ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनुवादाचे समर्थन केले असून पंतप्रधानाचे हे कृत्य अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यापेक्षाही अधिक गंभीर आहे.संविधानाची शपथ घेऊन देशाच्या पंतप्रधानपदावर बसलेला व्यक्ती मनुवादाचे आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन कसे काय करू शकतो? देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती जात धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या विधानाचे समर्थन करतो हे या देशाचे दुर्दैव आहे.त्यामुळे संविधानासमोर नतमस्तक होऊन शपथ घेणारे देशाचे पंतप्रधान खोटारडे आहेत, हे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून दाखवून दिल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.

त्यामुळेच देशातील बहुजनांचा अपमान करणा-या भाजप विरोधात प्रदेश काँग्रेस राज्यभरात आंदोलन करून देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणू पाहणा-या मनुवादी भाजपाचा निषेध करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
……………………….

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech