मुंबई – एखाद्याचे मानसिक संतुलन बिघडले की, तो राहील का मी राहीन, अशी भाषा केली जाते. आज उद्धव ठाकरे यांनी केलेले भाष्य हे मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण असल्याची घणाघाती टीका शिवसेना सह प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनांना मिळणारा जबरदस्त प्रतिसाद, राज्यात झालेली ८१ हजार १६७ कोटींची गुंतवणूक यामुळे विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त झाले असल्याचे डॉ. वाघमारे म्हणाले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. वाघमारे म्हणाले की, जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. ज्यांच्या हाताला कधी माती लागली नाही ते उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय बोलणार? उद्धव ठाकरेंना स्वप्नांतील गोष्टींबाबत बोलण्याची सवय झाली आहे. मुंबई महापालिका कोणी विकू शकेल का, असा प्रश्न उपस्थित करत ड़ॉ. वाघमारे यांनी खिल्ली उडवली. खोटं नरेटिव्ह सेट करण्याचे उबाठाचे प्रयत्न सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्ये येत आहेत, असे डॉ. वाघमारे म्हणाले.
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला महाविकास आघाडीचा एकही नेता फिरकला नाही आणि तेच नेते बाहेर जाऊन बडबड करत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा घुमजाव केले. त्यांनी त्यांची भूमिका न सांगता केंद्र सरकारवर बोट ठेवले. जोपर्यंत उबाठा, शरद पवार आणि काँग्रेसची आरक्षणावर भूमिका स्पष्ट करत नाहीत तोवर त्यांना आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, असे डॉ. वाघमारे यांनी ठणकावले.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले, अशी ओरड करणाऱ्या विरोधकांच्या कानशिलात लगावण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. महाराष्ट्रात ८१ हजार १६७ कोटींची गुंतवणूक झाली. यातून जवळपास ७५ हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
संजय राऊत यांचे डोके ताळ्यावर नसल्याने ते वेड्यासारखी बडबड करत आहेत, अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निधड्या छातीचे आहेत. ते गुवाहटी गेले ते उद्धव ठाकरे यांना फोनवर थेट बोलून गेले. उबाठासारखा पाठिमागून वार करणारा आमचा नेता नाही, असा टोला डॉ. वाघमारे यांनी लगावला.