* ७२ वर्षांनी मराठी खेळाडूची कामगिरी
पॅरिस – भारताच्या नेमबाज स्वप्निल कुसाळेने आज ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये कांस्य पदक पटकावले. स्वप्निल हा कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी (ता. राधानगरी) गावचा आहे. या विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी, तसेच ठिकठिकाणी पेढे वाटून आणि फटाके फोडून विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला.
ऑलिम्पिकमधील भारताची ही तिसरी कामगिरी आहे. यापूर्वी मनू भाकरने दोन तर सरबज्योत सिंगने एक कांस्यपदक जिंकले आहे. स्वप्निल कुसाळेने पात्रता फेरीत ५९० गुण मिळवत सातवे स्थान मिळवले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याच्याच संघातील ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर ५८९ गुणांसह ११ व्या स्थानावर राहिला आणि अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला.
स्वप्निलने पुण्यातील बालेवाडीतील क्रीडा प्रबोधिनीमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. स्वप्निल भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारा खाशाबा जाधव यांच्यानंतरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव हे भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्रातील पहिले खेळाडू ठरले होते. त्यांनी १९५२ साली ही कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर ७२ वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना भारतासाठी पदक मिळवून देण्यात अपयश आलं होतं.
५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत तीन प्रकारे नेमबाजी करावी लागते. पहिल्या प्रकारात गुडघे टेकून, दुसऱ्या प्रकारात प्रोन स्थितीत, आणि शेवटी उभे राहून नेमबाजी करावी लागते. कुसाळेने या तीनही प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करत अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली आणि भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली. स्वप्निलच्या या यशामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघाची ताकद दिसून आली आहे, आणि त्याच्या कर्तृत्वाने महाराष्ट्रालाही अभिमान वाटावा असे हे यश आहे.
स्वप्नीलचा जन्म ६ ऑगस्ट १९९५ रोजी झाला. स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे. अभिनव बिंद्राला २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने बारावीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. २००९ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.
स्वप्नील कुसाळे मध्य रेल्वेत कार्यरत
स्वप्नील २०१५ पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे. ज्याप्रमाणे एमएस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. भारताचा हा नेमबाज महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे. स्वप्नील म्हणतो की त्याने एमएस धोनीचा बायोपिक अनेकदा पाहिला आहे आणि धोनीच्या कामगिरीपासून मी प्रेरणा घेतली आहे. धोनी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, तर शूटिंगसाठी देखील शांत आणि संयमशील स्वभावाची आवश्यकता असते.