* तब्बल ५२ वर्षांनंतर चारली ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ
पॅरिस – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने गट सामन्यात प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा ३-२ असा पराभव केला. तब्बल ५२ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारतानं ग्रुप स्टेजमध्ये एकूण ५ सामने खेळले, त्यापैकी ३ जिंकले, १ अनिर्णित राहिला आणि १ सामना गमावला.
भारताच्या हरमनप्रीत सिंहने पुन्हा एकदा कर्णधारपदाला साजेशी भूमिका बजावली. हरमनप्रीतने सर्वाधिक २ गोल केले. तर अभिषेकने १ गोल केला. ऑस्ट्रेलियाकडून थॉमस क्रेग आणि ब्लेक गोवर्स या दोघांनी प्रत्येकी १-१ गोल केला. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या क्षणी आणखी एक गोल करुन सामना बरोबरीत सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र भारतीय खेळाडूंनी यशस्वीपणे आघाडी कायम राखून विजय मिळवण्यात यश मिळवलं. या सामन्यात भारतासाठी अभिषेक आणि हरमनप्रीत सिंग यांनी ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकललं.