ठाणे – नुकत्याच पुणे येथे झालेल्या ४० व्या सब ज्युनियर आणि ५० व्या ज्युनियर राष्ट्रीय निवड स्पर्धेत 11 वर्षाखालील गटात ठाण्यातील स्टारफिश फाऊंडेशनची जलतरणपटू निधी तुषार सामंत हिने ५ पैकी ५ सुवर्ण पदके पटकावून सर्वोत्कृष्ट महिला जलतरणपटूचा किताब पटकाविला. तिची एकूण 7 विविध जलतरणप्रकारात महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
तसेच आदित्य रुपेश घाग याने १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात रौप्य पदक पटकाविले असून त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या राष्ट्रीय स्पर्धा 6 ते 11 ऑगस्ट रोजी भुवनेश्वर ओरिसा येथे होणार आहे. हे दोन्ही जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेत आहेत.
या दोन्ही जलतरणपटूंचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त मीनल पालांडे, कार्यालयीन अधीक्षक रिमा देवरुखकर, महाराष्ट्र जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे, जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव अतुल पुरंदरे, उपव्यवस्थापक रवी काळे यांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.