(योगेश त्रिवेदी )
मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीत दणदणीत बाजी मारीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने महायुतीचा जबरदस्त धुव्वा उडविला. उद्धव ठाकरे यांचे वास्तव्य असलेल्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मुंबई विभागीय कॉंग्रेस अध्यक्षा प्रा वर्षाताई गायकवाड यांच्या नावासमोरील पंजाचे बटण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने दाबले. प्रा वर्षाताई गायकवाड यांनी प्रथितयश वकील उज्ज्वल निकम यांचा प्रचंड मताधिक्याने पराभव केला. निकमांचा पराभव करुन ही यशाची उज्ज्वल परंपरा आता वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात डॉ उज्ज्वला जाधव यांच्या नावासमोरील पंजाचे बटण दाबून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुढे कायम राखणार काय ? अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. महिलांना राजकरणात महत्त्वाचे स्थान देऊन त्यांचा सन्मान करणे ही काँग्रेस पार्टी ची परंपरा आहे . काँग्रेसने प्रथम मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीत प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या सारख्या सक्षम आणि सुशिक्षित महिलेला मुंबई विभागीय कांग्रेसचे अध्यक्षपद देऊन इतिहास घडविला आहे. या आधीही या भीम कन्येला मंत्रीपद देऊन सत्तेत वाटा दिला आणि आता तर खासदार बनवून लोकसभेतही पाठविले. मुंबई मधे काँग्रेस मजबुत करण्या साठी प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी खुप मेहनत घेतली . “स्वतः विजयी भव् !” होऊन एका दिग्गज उमेदवाराला हरविणे सोपे नव्हते पण त्यांनी त्यांची क्षमता सिद्ध केली. मुंबई काँग्रेस मधे पुरुषांबरोबरच खांद्याला खांदा लावून सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांची मजबुत फळी निर्माण करुन त्यांना पक्षात सामावून घेत पक्षाला महिला नेतृत्वाचा आश्वासक चेहरा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली.
लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतुन निवडणुक लढतांना त्यांच्या बरोबर बऱ्याच नवीन कार्यकर्त्यांना जोडून घेण्यात त्या यशस्वी झाल्या. त्याचेच एक उदाहरण म्हणजे त्यांनी जोडलेला आंबेडकरी चवळीतील नामवंत महिला चेहरा, ज्या भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचीत जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या होत्या आणि मुंबई विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. नुकत्याच त्या विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. समाजातील सर्व स्तराशी संपर्क असणाऱ्या आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या परमपवित्र संविधानाच्या खऱ्या अर्थाने संरक्षक असलेल्या वांद्रे निवासी डॉ. उज्ज्वला जाधव यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवशीच राजीव गांधी भवन येथील कार्यालयात मोठा पुष्पहार घालून आणि केक कापुन त्यांचा कांग्रेस मध्ये प्रवेश करवून घेतला आणि त्यांच्या हाती कांग्रेसचा झेंडा दिला आणि एक खंबीर नेतृत्व खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या मागे आता उभे राहिले आहे. गेल्याच महिन्यात काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना पक्षाचे छापील फॉर्म देऊन १० ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज मागविले होते. त्यामुळे तेंव्हापासून टिळक भवन ला दररोज शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याने विधानसभे मध्ये अनेक जागा या कांग्रेस च्या पारड्यात पाडतील यात सध्या तरी कुणाचे दुमत नाही, अशी चर्चा आहे. लोकसभा – विधानसभां मध्ये महिलांना आरक्षण लागु होण्याआधीच पक्षात बऱ्याच प्रमाणात उमेदवारी दिली गेली आहे. तसेच काँग्रेस पक्ष हिंदुं बरोबर दलित, बहुजन व अल्पसंख्याक समजाला सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रा सोबतच मुंबईत ही जास्तीत जास्त महिलांना पक्ष संधी देईल, असे चित्र आहे . खात्रीलायक सुत्रा कडून कळते की सत्ताधारी भाजपा सारख्या पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेस मधे प्रवेश केलेल्या डॉ. उज्ज्वला जाधव यामुळेच एक सक्षम महिला उमेदवार म्हणुन पुढे येत आहेत. त्यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेस पक्षा कडे उमेदवारी मागितली आहे. वांद्रे पूर्वचे काँग्रेस आमदार झीशान सिद्धिकी यांचे वडील आणि काँग्रेस चे माजी आमदार बाबा सिद्धिकी हे जाहीर रीत्या राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या गटाबरोबर गेले आणि तेंव्हापासून झीशान सिद्धिकी हेही पक्षा बरोबर प्रामाणिक नाहीत असे विधानपरिषदेच्या निवडणुकीत दिसून आले. वांद्र्यातील काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत तसेच काँग्रेस नेतृत्व पण त्यांच्यावर नाखूष आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणे शक्य नाही, अशी चर्चा आहे.
कलिना कॅम्पस मुंबई विद्यापिठाच्या माध्यमातून सर्वांना परिचित असणाऱ्या डॉ. उज्ज्वला जाधव या एलीट वर्गात मोडणाऱ्या तसेच राजकारणाची आणि समाजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या सुशिक्षित, सर्व बाजूने सक्षम महिला कार्यकर्त्या आहेत, ही त्यांची जमेची बाजू आहे. अशा भाजपा कडून आलेल्या निष्कलंक चेहऱ्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून काँग्रेस ला हद्दपार करा म्हणणाऱ्या आणि दुसऱ्यांचे पक्ष पळवणाऱ्या आणि ठोकशाहीची भाषा करणाऱ्या भाजपाला पुन्हा एकदा चपराक लगावण्याच्या तयारीत काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आहे हे येत्या काळात स्पष्ट होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सहपरिवार लोकसभा निवडणुकीत मुंबई विभागीय कॉंग्रेस अध्यक्षा प्रा वर्षाताई गायकवाड यांच्या नावासमोरील पंजाचे बटण दाबले होते आता विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामधून झिशान सिद्दिकी या आमदाराला त्यांच्या गद्दारीची शिक्षा म्हणून डॉ उज्ज्वला जाधव यांच्या नावासमोरील पंजाचे बटण दाबून महाविकास आघाडीचा मित्रधर्म निभावतील अशी ग्वाही कॉंग्रेसचे कार्यकर्ते देत आहेत.