नाशिक – महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती शीतयुद्ध सुरू झाले असून ठाकरे गटाने जिल्ह्यात उमेदवार घोषित केल्यानंतर त्याला आता शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रति उत्तर दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या दोन मित्र पक्षांमध्येच कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू झाले आहे
लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी असताना शिवसेना ठाकरे गटाने परस्पर सांगलीच्या जागेवर उमेदवाराची एकतर्फी घोषणा केली व हसू करून घेतले. आताही शिवसेना (ठाकरे) गटाचा तो प्रचंड आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळत असल्याचा घणाघात पवार गटाकडून करण्यात आला. शरद पवार गटाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ओबीसीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छबू नागरे, मुख्य शहर- जिल्हा सरचिटणीस मुत्राभाई अन्सारी, देवळाली विद्यानसभेचे अध्यक्ष अशोक पाळदे, शहर जिल्ह्याचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भवनेस राऊत, पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष धनंजय रहाणे आदींसह उपस्थित होते.
महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटप झालेले नसतानादेखील शिवसेना (ठाकरे) गटातील स्थानिक नेत्यांनी नाशिक मध्य व नाशिक पश्चिम मतदारसंघ जागा लढवण्याची एकतर्फी घोषणा केली. मात्र, ठाकरे गटाची फक्त शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड ताकद असून, पंधराही मतदारसंघात मातब्बर उमेदवारांची रांग लागली असल्याची उपरोधिक टीका करत त्यांनी फक्त दोनच जागांची घोषणा करणे म्हणजे ठाकरे गटावर नामुष्की ओढावेल. ते टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व १५ विधानसभा जागा ठाकर गटाने लढवाव्यात, अशी शरद पवार गटाची मागणी आहे. गटाच्या नेत्यांनी पुढाकार घेत उर्वरित १३ जागांवर ठाकरे गटाच्या उमेदवारांची घोषणा करत आहोत. आम्ही ठाकरे गटाचा प्रचार करू व सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेऊ, असेही म्हटले आहे.