टाटा समूहाचे चीनच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील वर्चस्वाला आव्हान !
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग आणि टेस्टिंग प्लांट या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर टाटा समूहाने चीन सीमेजवळ आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात २७,००० कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग आणि टेस्टिंग प्लांटची भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली. चीनच्या सीमेजवळ हा प्रकल्प उभारून टाटा समूहाने चीनच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील वर्चस्वाला आव्हान निर्माण केले.
या प्रकल्पामुळे दररोज ४.८३ कोटी चिप्सची निर्मिती होणार असून, भारताला सेमीकंडक्टर क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याचा टाटा समूहाचा उद्देश आहे. टाटा सन्स लिमिटेडचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी या प्रकल्पाचे नेतृत्व केले आहे. सेमीकंडक्टर उत्पादनात चीन आघाडीवर असताना, भारताने या क्षेत्रात पाऊल टाकले, ज्यामुळे चीनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
सेमीकंडक्टर चिप्सला ‘फ्यूचरमधील ऑयल’ असे म्हटले जाते, कारण त्यांचा वापर कार, मोबाइल आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये केला जातो. सध्या, अमेरिका आणि इतर देश सेमीकंडक्टरसाठी चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. अमेरिकन कंपन्या त्यांच्या आवश्यकतेच्या ६० ते ७० टक्के चिप्सची आयात चीनकडून करतात. मात्र, भारताच्या या नवीन प्रकल्पामुळे चीनच्या वर्चस्वाला धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसण्याची शक्यता आहे.
सेमीकंडक्टर उत्पादनासाठी टाटा समूहाने आसाम सरकारसोबत ६० वर्षांचा करार केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीनच्या वर्चस्वाला तडा देण्याची तयारी भारतीय उद्योगपती रतन टाटा यांनी केली आहे. या निर्णयामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकल्पामुळे चीनच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील वर्चस्वाला आव्हान निर्माण झाले.