एकमेकांचा बाप काढण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही……! भाजप गटनेते प्रवीण दरेकरांनी जरांगेना खडसावले

0

 

(अनंत नलावडे)

मुंबई – मराठा समाजाची लोकं सगळ्या पक्षांत नेतृत्व करताहेत. मात्र पक्ष मोठा की बाप यापेक्षा आंदोलनाचा बाप हा मराठा समाज आहे.जो मराठा समाज सर्व पक्षांत,विभागांत विखुरलेला असल्याने अशा प्रकारे एकमेकांचा बाप काढण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलेला नाही, अशा परखड शब्दात भाजप गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी गुरूवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांना खडसावले. खा.नारायण राणे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना अरेतुरे बोलणे, त्यांची धुलाई करणार बोलणे, छगन भुजबळांविषयी अशलाघ्य बोलणे,चंद्रकांत पाटील यांना चंपा बोलणे, मराठा समाजालाही आवडणारे नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दोन-चार अपवाद वगळले तर या महाराष्ट्राचे नेतृत्वच मराठा समाजाच्या नेत्यांनी केलेले आहे.आता प्रत्येक जात मोठी की पक्ष मोठा अशा प्रकारचे समाजविघातक वक्तव्य जरांगेंनी करू नये, असा मोलाचा सल्ला देत दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विधानांचा खरपूस समाचारही घेतला.

ते म्हणाले एका मराठा समाजाच्या लेकराला उघडं पाडायचा हा माझा अजिबात उद्देश नसून उलट मराठा समाजाचे हे लेकरू जागृत राहिले पाहिजे.कुणीतरी या लेकराला चालवू नये आणि आपले राजकारण करू नये अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. कारण मराठा समाजाला बऱ्याच वर्षांनी आपले कुणीतरी भुमिका घेऊन काम करतेय हा विश्वास येऊ घातला होता तो जाऊ नये याची काळजी आम्ही घेत असल्याचेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरेकर पुढे म्हणाले की, जरांगे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असलेला आकस,पोटशूळ काही कमी होताना दिसत नाही.फडणवीसांनी मराठा समाजाचे भविष्य घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.मराठा समाजाचे भविष्य नासविण्याचा कुणी प्रयत्न केलाय ज्यांनी एवढी वर्ष नेतृत्व केले, ज्यांनी मराठा समाजाच्या भविष्यासाठी काहीच केले नाही त्यांना एका शब्दाने विचारत नाही.ज्या फडणवीसांनी आरक्षण दिले,टिकवले, फेटाळले गेले नाही त्यांना दोष देणार. ज्यांनी सारथी,अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभे केले ते कसे काय समाजाचे अहित बघू शकतात.परंतु जरांगेंना देवेंद्र द्वेष आहे.फडणवीस त्यांच्या राजकारणाचा टार्गेट आहे.त्यामुळे ते आरक्षणावर, मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत.सरकारशी चर्चा करत नाहीत. ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुमिका काय आहे अशी विचारणा शरद पवार,उद्धव ठाकरे,नाना पटोलेंना करा.मात्र त्यावर जरांगे काहीच बोलत नाहीत.केवळ हमरीतुमरीवर येऊन एकेरी बोलणे,घाणेरड्या शब्दांत विभत्सना करणे हे समाजातील कुठल्याच सुसंस्कृत समाजाला आवडणारे नाही, याकडेही दरेकर यांनी यावेळी लक्ष वेधले.

दरेकर पुढे म्हणाले की, राज ठाकरे यांना धाराशिव बाहेर जाऊ दिले नसते अशा प्रकारच्या धमक्या देण्याचे काम जरांगेंनी करू नये.परंतु ते न करता तेथील राजकीय पुढारी कोण, तेथील निवडणुका कुणाला लढवायच्या आहेत.उमेदवार कोण उभा करता येईल,कोणाला पाडण्यासाठी कटकारस्थान करावे लागेल.हा मराठा समाजाचा फोकस नाही.मराठा समाजाचे नेतृत्व त्या-त्या पक्षात, मतदार संघात प्रगल्भ आहे.त्यांना त्यांची राजकीय भुमिका समजते.परंतु आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
………………

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech