नवी दिल्ली – नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF), अर्थात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघटनेद्वारे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह, सहकाराच्या आठ क्षेत्रांमधील राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार देखील प्रदान करतील. नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF) ही देशभरातील सर्व, 260 सहकारी साखर कारखाने आणि नऊ राज्य साखर महासंघांची शिखर संस्था आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह शनिवार, 10 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे आयोजित ‘साखर परिषद आणि राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार 2022-23’ या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’, अर्थात सहकारातून समृद्धी, या दृष्टीकोनाला अनुसरून, सहकारी साखर कारखान्यांना चालना देण्यासाठी सहकार मंत्रालयाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या बळकटीकरणासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाला (NCDC) दिलेले अनुदान, याचा समावेश आहे.
कार्यक्षमता पुरस्कार 2022-23, या स्पर्धेत देशभरातील 92 सहकारी साखर कारखाने सहभागी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 38, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील प्रत्येकी 11, तामिळनाडूमधील 10, पंजाब आणि हरियाणातील प्रत्येकी 8, कर्नाटकातील 4, आणि मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी 1, सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.
सहभागी साखर कारखान्यांना समान संधी मिळावी, यासाठी देशातील साखर कारखाना क्षेत्राची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक यांना पहिल्या गटात ठेवण्यात आले आहे, कारण देशाच्या साखर उत्पादनात या राज्यांचा मोठा (10 टक्क्यांपेक्षा जास्त) वाटा आहे. या गटातून देशातील एकूण 53 सहकारी साखर कारखाने सहभागी झाले आहेत. उर्वरित (सरासरी साखर उत्पादन 10 टक्क्यांपेक्षा कमी) राज्यांचा दुसरा गट तयार करण्यात आला, आणि यामध्ये एकूण 39 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला.