माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन
`टिटवाळा मंदिर परिसराचा विकास करणार’
कल्याण – राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे. तसेच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ पुन्हा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गुरुवारी येथे केले. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिर परिसराच्या सुशोभीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली.
भाजपाचे कल्याण मंडल अध्यक्ष वरुण सदाशिव पाटील यांच्या गोल्डन पार्क चौकातील जनसेवालय जनसंपर्क कार्यालयाचे कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी राज्य सरकारच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत गणपती मंदिर चौक येथे दीपमाळेचे सुशोभीकरण व चेकर्स बसविणे आणि गणपती मंदिर चौक ते एमटीडीसीपर्यंतच्या कॉंक्रीट रस्त्याच्या कामाला मंजूरी देण्यात आली होती. या कामांचे पाटील यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन करण्यात आले. या वेळी भाजपाचे कल्याण शहर जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक अर्जुन म्हात्रे, अर्जुन भोईर, डॉ. शुभा पाध्ये, संतोष तरे, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, महागणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष जोशी, कल्याण मंडल अध्यक्ष वरुण पाटील, मोहने-टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तिवान भोईर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी, शहराध्यक्षा वैशाली पाटील, मंगल वाघ, राजा पातकर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
भाजपाची समाजकारणातून राजकारण ही परंपरा आहे. त्यानुसार वरुण पाटील यांच्या कार्यालयातून सामान्य नागरिकांची कामे होतील, असा विश्वास व्यक्त करून माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी कार्य करावे. पक्षाच्या स्थानिक स्तरावरील भूमिकेचा वरिष्ठ पातळीवर विचार केला जाईल. परंतु, त्याकडे न पाहता महायुतीच्या विजयासाठी कामाला लागावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाचे कपिल पाटील यांनी स्वागत केले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या प्रयत्नातून बांगलादेशातील हिंदू व हिंदूंच्या मंदिराला संरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिर परिसरात दररोज भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. या भाविकांच्या सुविधेसाठी विकासकामे केली जातील. यापूर्वी या ठिकाणी दिपमाळ व रस्त्याच्या कामासाठी ८० लाख रुपयांचा निधी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता. त्याचे भूमिपूजन झाले, अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.