पालकमंत्र्यांचा जनता दरबार म्हणजे निवडणुकीचा फार्स – आमदार वैभव नाईक

0

सिंधुदुर्ग – अडीच वर्षाच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यात शिंदे- फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे.जिल्ह्यात आरोग्य, कृषी, महसूल,शिक्षण या विभागांसह अन्य विभागाचे शेकडो प्रश्न प्रलंबित असून जिल्ह्यातील जनतेला त्याचा सामना करावा लागत आहे.परिणामी शिंदे- फडणवीस सरकारवर जनता नाराज आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जनता दरबार आयोजित केला आहे. मी विरोधी पक्षात असताना देखील लोकशाही मार्गाने मला पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनचा निधी दिला आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु जिल्ह्यातील प्रश्न सुटणे देखील तितकेच गरजेचे होते. अशी टीका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. जिल्ह्यात १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे, त्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक बोलत होते.

वैभव नाईक पुढे म्हणाले, शिंदे गटाशी जवळीक असलेले जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांना जुमानत नाहीत. जिल्हाधिकारी जुमानत नसतील तर बाकीचे अधिकारी किती गांभीर्याने घेणार हा देखील प्रश्नच आहे. कोकणचे भाग्यविधाते म्हणवून घेणाऱ्यांची मक्तेदारी रविंद्र चव्हाण यांनी मोडून काढली. भाजपचे कोकणचे नेते म्हणून रविंद्र चव्हाण उदयास येत आहेत. त्यामुळे राणेंना हे पचनी पडत नाही. परिणामी महायुतीतच रस्सीखेच सुरु असल्याने पूर्वीच्या पालकमंत्र्यांना न सुटलेले जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यात विद्यमान पालकमंत्री रविंद्र चव्हाण देखील अपयशी ठरले आहेत अशी टीका नाईक यांनी केली आहे.

आमदार वैभव नाईक म्हणाले, गेल्या १० वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविलेले तीनही मंत्री हे महायुतीतच आहेत. विद्यमान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अडीच वर्षे, उदय सामंत यांनी अडीच वर्षे आणि दीपक केसरकर यांनी ५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविले. आणि त्यांच्या जोडीला केंद्रीयमंत्री नारायण राणे देखील होते. मात्र या चारही मंत्र्यांना सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रश्न सोडविता आलेले नाहीत. चारही मंत्री अकार्यक्षम ठरले आहेत. सिंधुदुर्गातील प्रश्नांसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारावरूनच हे सिद्ध होते. आता जनता दरबाराच्या त्यानिमित्ताने तरी जिह्यातील जनतेचे प्रश्न सत्ताधाऱ्यांना कळतील.

जिल्ह्यात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना ते कधी कळलेच नाहीत आणि त्यांनी कळूनही घेतले नाहीत. प्रश्न सोडविण्यापेक्षा निवडणुकीत पैसे वाटणे हे त्यांना सोपे वाटते. पूरस्थितीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले परंतु विद्यमान खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्यात मोठा पाऊस पडलाच नाही असे सांगून नुकसानग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले. आणि नुकसानग्रस्तांना एक रुपयाची देखील नुकसान भरपाई मिळाली नाही. त्याचबरोबर मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही नुकसान भरपाईमध्ये कोकणचा समावेश सरकारने केलेला नाही. ही शिंदे-फडणवीस सरकारने जनतेची केलेली घोर चेष्टा आहे.

जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. अपुऱ्या सोयींमुळे मेडिकल कॉलेजला दंड भरावा लागला. रुग्णांना देखील आवश्यक उपचार मिळत नाहीत.१०८ रुग्णवाहिका मिळत नाही. कुडाळ येथील जिल्हा महिला बाल रुग्णालयात फर्निचरसाठी शिंदे- फडणवीस सरकार पैसे देत नाहीत म्हणून सी. एस.आर. फंडाची मदत घ्यावी लागते. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधा रामभरोसे आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech