लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन दुपारी एक वाजता करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, “अत्यंत महत्वाचे” असं म्हणत मोबाईल हॅक झाल्याची माहिती दिली आहे.
“माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. थेट पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेल्याने यामागील व्यक्तींच्या नावासंदर्भात लवकरच खुलासा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा विरोधी पक्षातील नेत्यांचे डिजीटल डिव्हाइज हॅक करण्याचा त्यावरील माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने त्यामध्ये वेगवेगळ्या ट्रोजनच्या माध्यमातून घुसखोरी करण्याचे आरोप अनेकदा झाले आहेत.