चाकरमान्यांना तिकिटे न मिळाल्यामुळे तीव्र संतापाची भावना

0

कोकण रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

रत्नागिरी – यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकणदरम्यान सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत ते फुल्ल झाल्याचे दिसले. त्यामुळे हजारो कोकणवासीय चाकरमान्यांमध्ये तिकिटे न मिळाल्यामुळे तीव्र संतापाची भावना आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोकण रेल्वेची तिकिटे उपलब्ध करून देण्याबरोबरच तिकीट आरक्षणात काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी याबाबतचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले आहे. पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकणदरम्यान सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्याचे दिसले. चाकरमान्यांमध्ये तिकिटे न मिळाल्यामुळे तीव्र संतापाची भावना आहे. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यातच खासगी बसचालकाकडून गणपती उत्सवाच्या काळात २ ते अडीच हजार रुपयांचा दर लावला जात आहे. ही अक्षरशः लूटमार आहे. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेची तिकिटे उपलब्ध करून द्यावीत, खासगी वाहनांच्या दरांवर नियंत्रण आणावे व तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विनंती जाधव यांनी केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech