नवी दिल्ली – भारतीय सैन्यातील पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्या क्रीडापटूंचा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सत्कार केला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक येथे हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाने एकूण 6 पदके (एक रौप्य आणि पाच कांस्य) पटकावली, ज्यामध्ये भारतीय लष्करातील सुभेदार मेजर नीरज चोप्रा यांनी भारतासाठी भालाफेकीत रौप्य पदक जिंकले आहे. या असाधारण कामगिरीची ऑलिम्पिक खेळांमधील भारतीय सैन्याच्या सर्वात उल्लेखनीय प्रदर्शनांपैकी एक म्हणून नोंद झाली आहे. पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये पहिल्यांदाच भारतीय लष्कराकडून हवालदार जस्मीन ही महिला क्रीडापटू मुष्टीयुद्धात सहभागी झाली. आशियायी क्रीडास्पर्धा 2023 मध्येही भारतीय लष्कराच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 10 कांस्य अशी तब्बल 20 पदकांची कमाई केली होती.
भारतीय लष्कराच्या क्रीडापटूंच्या अशा प्रकारच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लष्करप्रमुखांनी अभिमान व्यक्त केला आहे. त्यांची शिस्त, चिकाटी आणि समर्पित वृत्ती भारतीय लष्कराच्या मूलभूत मूल्यांचे प्रतीक आहे. त्यांच्या कामगिरीने केवळ बहुमानच प्राप्त केलेला नाही तर इतर असंख्य लोकांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले आहे. भारतीय लष्कर देशासाठी सामर्थ्य, शौर्य आणि शिस्त यांचा एक स्तंभ म्हणून उभे असून, आपल्या सीमांचे रक्षण करण्याच्या आपल्या प्राथमिक उद्दिष्टापलीकडे, लष्कर सातत्याने खेळांसहित विविध सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये आपल्या बांधिलकीचे दर्शन घडवत आहे, राष्ट्र उभारणीत सर्वांगीण योगदान देत आहे. भारतीय लष्करातील खेळाडू उत्कृष्टतेचा शोध सुरू ठेवतील आणि आगामी काळात यशाची आणखी शिखरे सर करतील असा विश्वास लष्करप्रमुखांनी व्यक्त केला आहे.