ठाणे – ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आले होते. छायाचित्रकारांनी टिपलेले विश्व अनुभवण्याची मोठी संधी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणेकरांना मिळाली आहे. यावेळी या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घघाटक आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. सरनाईक यांनी बोलतांना छायाचित्रकारांचे अनुभवांचे कौतुक केले. छायाचित्रकार बनण्यासाठी आवड आणि जिद्द महत्त्वाची असून त्यासाठी छायाचित्र काढायला मेहनत लागते. नेमका क्षण टिपणे हे छायाचित्रकारांचे कौशल्य आहे. छायाचित्रकारांचे कौशल्य या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणे महापालिका व पत्रकार संघाच्या माध्यमातून जनसामान्य नागरिकांसाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणेकरांनी जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यानी पुढील चार दिवसात हे प्रदर्शन पहावे, असे प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवरील प्रदर्शन आणि स्पर्धा यांचे आयोजन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका ही सांस्कृतिक क्षेत्रातही नेहमी आघाडीवर असते. धर्मवीर आनंद दिघे आणि वसंतराव डावखरे यांनी रुजवलेली ही संस्कृती मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे कायम ठेवली आहे. त्यामुळेच असे चांगले उपक्रम आयोजित केले जातात. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानेही हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या प्रदर्शनाची ख्याती देशभर पसरावी, अशा शुभेच्छा याप्रसंगी आमदार सरनाईक यांनी दिल्या. उद्घाटनानंतर आमदार प्रताप सरनाईक व आमदार निरंजन डावखरे यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले आणि छायाचित्रकारांचे कौतुक केले.
ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचे उद्घाटन सरनाईक यांनी केले. या प्रसंगी, आमदार निरंजन डावखरे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती जनसंपर्क) उमेश बिरारी, उपायुक्त (क्रीडा) मीनल पालांडे, ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, तसेच निलेश पानमंद, विभव बिरवटकर, प्रफुल्ल गांगुर्डे, अनुपमा गुंडे, विकास काटे, अशोक गुप्ता, पंकज रोडेकर, आदी पदाधिकारी तसेच ज्येष्ठ छायाचित्रकार दीपक जोशी उपस्थित होते.
प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले :
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय असे तीन गट होते. शिवाय महाविद्यालयीन गटही होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, २० ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता होणार आहे. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन आजपासून मंगळवार, २० ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ९ या काळात नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले आहे.