रत्नागिरी – मुंबईतील भांडुप रेल्वेस्थानकावर कोकण रेल्वेच्या गाड्यांना थांबा देण्यास रेल्वे प्रशासनाने अनुकूलता दर्शवली आहे. तो लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. गाड्या थांबविण्यासाठी भांडुप स्थानकावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ४१ कोटीची तरतूद केली आहे. तसेच उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे भांडुप, कांजूरमार्ग, घाटकोपर आदी भागात मोठ्या संख्येने राहणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा फायदा होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या ठाण्यानंतर थेट दादर येथे थांबतात. त्यामुळे पूर्व उपनगरात भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर आदी भागात राहणाऱ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत येणाऱ्या आणि तेथून परतणाऱ्या चाकरमान्यांना दादर अथवा ठाणे येथे उतरून पुन्हा लोकल पकडून घरी यावे लागते. यासाठी गेल्या पाच- सहा वर्षांपासून चाकरमान्यांनी भांडुप येथे कोकण रेल्वेला थांबा द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे. अखेर रेल्वे प्रशासनाने कोकणातून येणाऱ्या गाड्यांना थांबा देण्याचे मान्य केले. कोकणकन्या आणि तुतारी एक्स्प्रेस या दोन गाड्यांना भांडुप रेल्वेस्थानकावर थांबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.