नाशिक – बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी घुसखोरांना नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यासोबतच एका स्थानिक संशयितासही ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे शागोर मोहंमद अब्दुल हुसेन माणी (२८), मुस्मम्मत शापला खातून (२६, दोघेही रा. काझी मंजिल, पाथर्डी गाव, नाशिक), इति खानम मोहंमद लाएक शेख (२७, रा. काझी मंजिल, पाथर्डी गाव, मूळ रा. जेलामोडाई, बांगलादेश) व गोरक्षनाथ विष्णू जाधव (३२, रा. काझी मंजिल, पाथर्डी गाव, मूळ रा. वरवंडी, ता. दिंडोरी) अशी एटीएसने ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
दहशतवादविरोधी पथक नाशिक युनिटच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगीता जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की हे तीनही आरोपी बेकायदेशीररीत्या कोणत्याही प्रकारची वैध परवानगी व कागदपत्रांशिवाय बांगलादेशातून भारतात प्रवेश करून वास्तव्य केले आहे, तसेच चौथा आरोपी गोरक्षनाथ जाधव याने तीनही आरोपींना बेकायदेशीररीत्या वास्तव्य करण्यास व राहण्यास सहाय्य केले म्हणून त्याच्याविरुद्ध पारपत्र नियम १९५० कलम ३ सह परकीय नागरिक आदेश अन्वये कारवाई करण्यात येऊन या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यातील संशयित घुसखोर शागोर माणिक हा पीओपी कारागिर आहे, तर मुस्मम्मत खातून हा मसाज पार्लरमध्ये काम करतो, तर इतिखानम हा सलूनमध्ये काम करतो. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. हे तीनही आरोपी नाशिकमध्ये विनापरवानगी घुसखोरी करून वास्तव्य करीत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.