गाजा – इस्रायल सध्या एकाचवेळी अनेक गंभीर संकटांचा सामना करत आहे. अशातच इस्रायलमधील जनतेत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाझामध्ये हमासविरुद्ध युद्ध सुरू आहे, तर इराणकडून कधीही हल्ल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, लेबनानमधूनही इस्रायलवर सतत हल्ले होत आहेत, ज्यामुळे इस्रायलमधील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. इस्रायल-लेबनान सीमेवर विशेषतः तणाव वाढला आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील सीमावर्ती भागात सतत एयर सायरन वाजत आहेत.
लेबनानमधून मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि रॉकेट हल्ले होत आहेत. इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार, उत्तर इस्रायलमधील गॅलिली, पॅनहँडल, आणि गोलान हाइट्स या भागांवर लेबनानमधून 40 रॉकेट आणि अनेक ड्रोन डागण्यात आले. काही ड्रोन पाडण्यात इस्रायल यशस्वी झाले, तर काहींनी लक्ष्यभेद केला आहे. या हल्ल्यांमुळे उत्तर इस्रायलमधील जनतेत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायली सैन्याने नागरिकांना आपल्या घरात सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आदेश दिले आहेत. लेबनानमधील हिजबुल्लाहचे दहशतवादी या हल्ल्यांच्या मागे असल्याचा संशय आहे.
लेबनानमधील मतमोरा येथील इमारतीवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचे अनेक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने या तणावपूर्ण परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या मते, इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये सुरू असलेले छोटे-मोठे संघर्ष परिस्थिती आणखी बिघडवू शकतात. दोन्ही देशांच्या सीमेवरील प्रत्येक घडामोडीवर अमेरिकेने लक्ष ठेवले आहे आणि स्थिती अधिक बिघडल्यास क्षेत्रीय स्थिरतेवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. सध्याची परिस्थिती इस्रायलसाठी मोठं आव्हान आहे. तिन्ही आघाड्यांवर संघर्ष सुरू असताना, इस्रायलने सावध राहण्याची आणि तात्काळ प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे.