पुणे – मंकीपॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने मंकीपॉक्सवरील स्वदेशी लसीची निर्मिती करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.आफ्रिकेतील बाराहून अधिक देशांमध्ये मुले आणि प्रौढांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. तसेच या विषाणूचा नवा प्रकार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या आजारावरील लसींचा पुरवठा कमी आहे. या परिस्थितीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चिंता व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे मंकीपॉक्सवरील लसीबाबतची माहिती दिली. मंकीपॉक्समुळे धोक्यात आलेल्या लाखो लोकांसाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या आजारावरील लसीसंदर्भात काम करत आहे. सध्याची प्रगती पाहता येत्या वर्षभरात सकारात्मक निष्कर्ष हाती येण्याची आशा आहे, असे पूनावाला यांनी नमूद केले.